



✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100
🔺कारवाईचा ठराव
म्हसवड(दि.16डिसेंबर):-माण पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या कारभारावर सभागृहाने मासिक मिटींगमध्ये ताशेरे ओढले आहेत. शिक्षण विभाग कामाबाबत गांभिर्याने घेत नाहीत. शिक्षण विभागात अनागोंदी कारभार सुरू असून तत्कालीन गटशिक्षण अधिकारी व सध्याच्या शिक्षणविस्तार अधिकारी यांच्या भ्रष्ट कारभारा विरोधात त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवा असा ठराव पंचायत समितीच्या मासिक मिटिंग मध्ये करण्यात आला. पंचायत समितीच्या वादळी सभेची जोरदार चर्चा सुरू असून याबाबतचे निवेदन ही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आले.
माण पंचायत समितीची मासिक सभा सभापती अपर्णा भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपसभापती नितीन राजगे, गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील , रमेश पाटोळे , कुमार मगर , तानाजी कट्टे , तानाजी काटकर , सौ.अपर्णा भोसले , चंद्राबाई आटपाटक सदस्य व सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.यावेळी विविध विषयावर चर्चा झाली.
परंतु सभा गाजली ती शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराच्या चर्चेने. पूर्वीच्या प्रभारी गटशिक्षण अधिकारी व सध्याच्या शिक्षणविस्तार अधिकारी यांच्या भ्रष्टाचाराचा पाढा सदस्यांनी वाचला. अनेक सदस्य या विषयावर आक्रमक झाले.अनेक महिला शिक्षकाकडून साड्यांची मागणी , तर काही शिक्षकांकडून धान्याची मागणी तसेच परजिल्ह्यातील शिक्षकांकडून यांच्या कडून त्यांना घरी च राहण्यासाठी आर्थिक तडजोड केल्याचा आरोप ही पंचायत समिती सदस्यांनी केला असून भ्रष्टाचाराचा पाढाच वाचण्यात आला. शिक्षण विभागाच्या कारभाराबाबत अनेक सदस्य आक्रमक झाले होते.काही महिन्यांपूर्वी शिक्षकदिना निमित्ताने देण्यात येणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारामध्ये ही शिक्षणविस्तार अधिकाऱ्यांंनी मनमानी कारभार केला आहे.२०१९ चा आदर्श शिक्षक पुरस्कार शिक्षण विभागाच्या घोळात व २०२० चा पुरस्कार कोव्हीड – १९ मुळे अडकला होता . २०२१ ला मागील दोन वर्षांसह यावर्षीचा अशा तीन वर्षाचा एकदम ७८ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
प्रत्येक वर्षी १९ केंद्रातून १९ शिक्षकांना त्यांच्या कामाबद्दल तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येतो. तीन वर्षाचे एकूण ५७ शिक्षकांना पुरस्कार देणे अपेक्षित असताना ७८ शिक्षकांना पुरस्कार दिले आहेत. म्हणजे २१ शिक्षकांना अतिरिक्त पुरस्कार दिले आहेत . सुरुवातीला शिक्षण विभागाने पंचायत समिती सदस्यांकडून एकुण ७३ शिक्षकांना पुरस्कार मंजूर करून घेतले होते. मात्र पुरस्कार वितरण सोहळ्यात ७८ शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. जादा ५ शिक्षकांना पुरस्कार कोणाच्या शिफारशीनुसार देण्यात आले आहेत. याचा खुलासा पंचायत समितीचे सदस्य कुमार मगर यांनी प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांना मागितला आहे.
आदर्श शिक्षक निवडताना शिक्षक संघटनांची शिफारस , वर्षभर राबविलेले सामाजिक उपक्रम , ज्ञानदानातील कौशल्य आणि विद्यार्थी विषयी असलेली निष्ठा याबाबत व पंचायत समिती सदस्यांची शिफारस महत्वाची आहे. येथे मात्र शिक्षणविस्तार अधिकांंऱ्याच्या मनमानी कारभारामुळे आदर्श शिक्षकांची संख्या वाढली आहे.
सदरच्या मासिक मिटींगमध्ये सर्वांनी मिळून महिला शिक्षणविस्तार अधिकारी यांना सक्तीच्या रजेवर पाठवा असा ठराव मंजूर करून घेतला. अशा प्रकारचा वेगळाच ठराव झाल्याने माण तालुक्यात खळबळ उडाली असून अनेक शिक्षक आता त्यांना झालेली पिळवणूक ही दबक्या आवाजात बोलू लागले आहेत.
* दोन शिक्षणविस्तार अधिकारीपद रिक्त
गटविकास अधिकारी नरेंद्र मडेवार यांचेकडे गटशिक्षणाधिकारी पदाचा प्रभारी चार्ज दिला आहे. यापूर्वी महिला शिक्षणविस्तार अधिकारी यांच्याकडे गटशिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार होता. गटशिक्षणाधिकारी पदाची अनेकवेळा संगीत खुर्ची असते. कित्येक वर्षांपासून या पदाचा वाणवा आहे. याशिवाय शिक्षणविस्तार अधिकारी एकुण ५ पदे मंजूर असून ३ पदे कार्यरत आहेत तर २ पदे रिक्त आहेत. ३ शिक्षणविस्तार अधिकारामध्ये २ महिला शिक्षणविस्तार अधिकारी तर १ पुरुष शिक्षणविस्तार अधिकारी आहे.


