



देशात अनेकदा फाळणीचा आणि हिंदुराष्ट्राचा विषय निघत असतो. भारताची फाळणी याविषयावर अनेक अभ्यासकांनी लिखाण केले आहे. तसेच ज्यांनी कधीच इतिहास वाचला नाही असेही काही लोक अनेकदा फाळणीबद्दल बोलतांना आपण बघतो. बहुतांश लोकांकडून महात्मा गांधींना फाळणीकरिता जबाबदार धरल्या जातं. फाळणी समजून घेण्याकरिता आपल्याला फाळणीची बीजे, फाळणीला जबाबदार लोक आणि फाळणी झाली हे चांगलं झालं की वाईट झालं? ह्या सर्व बाबी ऐतिहासिक संदर्भांच्या आधारे समजून घ्याव्या लागतील.
पाकिस्तान निर्मितीची बीजे ही टिळकांनी 1916 मध्ये केलेल्या लखनौ करारामुळेच रोवल्या गेली होती. काँग्रेसकडून लोकमान्य टिळक तर मुस्लिम लीग कडून मोहम्मद अली जिना यांच्यामध्ये हा करार झाला. यात मुस्लिमांच्या स्वतंत्र मतदारसंघाला मान्यता देण्यात आली. उर्दू भाषेला विशेष दर्जा दिला गेला. मुस्लिमांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणाहून जास्त प्रतिनिधित्व दिलं गेलं. इथेच पाकिस्तानचा पाया रचला गेला. त्यानंतर 1937 साली अहमदाबाद येथे झालेल्या हिंदू महासभेच्या अधिवेशनात विनायक सावरकर देखील म्हणाले होते की, आज हिंदुस्थान एकजीव व एकात्म राष्ट्र झालेले आहे असे मानण्याची चूक आपण करता कामा नये. उलट या देशात मुख्यतः हिंदू आणि मुसलमान ही दोनही राष्ट्रे आहेत हे मान्य करून चालले पाहिजे. हाच द्विराष्ट्रवाद मांडत पुढे सर्वप्रथम प्रत्यक्षपणे जिनांनी फाळणीची मागणी केली.
1942 मध्ये तेव्हाचे काँग्रेस अध्यक्ष मौलाना आझाद यांनी नेहरूंच्या उपस्थितीत एका ब्रिटिश पत्रकाराला देशाची व काँग्रेसची अडचण सांगितली होती. ते म्हणाले, काँग्रेसला फाळणी नको; मात्र ती नेहमीसाठी नाकारता येणेही आता शक्य दिसत नाही. कारण येथील मुसलमानांना हिंदूंसोबत राहायचे नाही. मात्र, लग्नाआधीच घटस्फोट घ्यायला आम्ही तयार नाही. काही काळ आम्हाला एकत्र राहू द्या. तसे राहणे जेव्हा अगदीच असह्य होईल तेव्हाच फाळणीचा विचार करणे योग्य ठरेल. ही झाली काँग्रेसची भूमिका. जेव्हा स्वातंत्र्य जवळ आल्याचं दिसू लागलं तेव्हा मुस्लिम लीग अधिक आक्रमक झाली. डायरेक्ट ऍक्शन चा ठराव घेतांना जिना म्हणाले, इंग्रजांजवळ भरपूर शस्त्रं आहेत. काँगेसजवळ सत्याग्रह आहे. आमच्याजवळ पिस्तूल आहे आणि त्याचा उपयोग करायची वेळ आली आहे. 16 ऑगस्ट 1946 या दिवशी जीनांनी डायरेक्ट एक्शनचा म्हणजेच सशस्त्र हल्ल्याचा आदेश लीगच्या सभासदांना दिला. त्याचा परिणाम म्हणून नौखालीत हिंदूंच्या कत्तली झाल्या. त्याची प्रतिक्रिया होऊन बिहारात मुसलमानांच्या कत्तली झाल्या आणि त्यांना उत्तर म्हणून रावळपिंडीत मुसलमानांनी शिखांच्या कत्तली केल्या.
हा देश तुटू नये, अखंड राहावा या उद्देश्याने गांधींनी जीनांना, तुम्हीच या अखंड देशाचे पहिले पंतप्रधान व्हा, असे म्हणून अनेकदा विनवले. त्याकरिता जीनांनी कुणीही मान्य करणार नाही अशा अटीही ठेवल्या. गांधींनी जिनांना देऊ केलेले अखंड हिंदुस्थानचे पंतप्रधानपद स्वीकारण्यापेक्षा एका नव्या राष्ट्राचा निर्माता व संस्थापक होणे, त्या नवीन राष्ट्राचा सर्वेसर्वा होणे ही गोष्ट त्यांच्या लेखी जास्त महत्त्वाची होती.गांधीजी शेवटपर्यंत इंग्रज व मुस्लिम लीगचे पुढारी यांच्याशी फाळणी नको या मुद्यावर लढत राहिले. परंतु गांधीजींच्या पश्चात त्यांना विश्वासात न घेता काँग्रेसचे ज्येष्ठ पुढारी पं.जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल व मौलाना आझाद यांनी भारताच्या फाळणीचा करार तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांच्याशी केला. त्यानंतर काँग्रेसच्या कार्यकारिणीत निमंत्रित सदस्य म्हणून जेव्हा गांधीजी हजर होते तेव्हा खाली मान घालून खिन्न स्वरात आम्ही पाकिस्तान देण्याचे वचन देऊन आलो आहोत असे पंडित नेहरूंनी सांगितले. देशात हजारो निरपराध लोकांची कत्तल, लाखो स्त्रियांची विटंबना, कोट्यवधी लोकांचे निर्वासित जीवन बघून भारताची फाळणी करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. या निर्णयावर हे पुढारी आले होते.
ज्येष्ठ विचारवंत वसंतजी बोंबटकर म्हणतात या बैठकीत हजर असलेले जयप्रकाश नारायण यांनी सेवाग्रामला बैठकीत आम्हाला या घटनेचे वर्णन करताना सांगितले की, नेहरूंचे हे निवेदन ऐकून गांधीजींवर भयंकर आघात झाला. त्यांनी विनवले की, “पुढचे पाऊल टाकण्यापूर्वी मला एक तरी संधी द्या. हा म्हातारा आमचे , ऐकत नाही असे व्हाईसरॉयला सांगा. मी देशाची फाळणी टाळण्यासाठी काही तरी मार्ग काढीन.” नंतर गांधीजींनी एकेकाकडे दृष्टिक्षेप टाकला. पुढे जयप्रकाशजींनी सांगितले की, कोणी काही बोलले नाही. जणू काही सर्वांची तोंडे शिवून टाकली होती. राम मनोहर लोहिया यांनीसुद्धा लिहून ठेवले आहे की, गांधीजी, खान अब्दुल गफारखान, जयप्रकाश नारायण व मी अशा चौघांनीच फाळणीला विरोध केला.
फाळणीबद्दल बोलतांना आपण टिळक, सावरकर आणि जिनांसोबतच फाळणीला सारखेच जबाबदार असणार्या ब्रिटिश सरकार आणि ब्रिटिश अधिकारी लॉर्ड माउंटबॅटन यांना विसरून चालणार नाही. 14 व 15 ऑगस्ट 1947 रोजी या प्राचीन भारताची दोन राष्ट्रांत विभागणी झाली. फाळणीच्या नंतर हिंदू व मुसलमान दहा लाख माणसे मारली गेली.
एवढा प्रचंड नरसंहार टाळता येणे सहज शक्य होते, असे आता ब्रिटिशांचे गुप्त दस्तऐवज खुले झाल्याने त्याच्याआधारे ब्रिटिश इतिहास संशोधकच म्हणू लागले आहेत. “या नरसंहाराबद्दल एकटे लॉर्ड माउंटबॅटनच जबाबदार असून त्यांच्यावर या नरसंहाराबद्दल महाभियोगच चालवावयास हवा” असे ब्रिटिश इतिहास संशोधक अॅन्ड्री रॉबर्ट्स यांनी म्हटले आहे. (अप्रीशियल ऑफ द 1940-50) आपल्या पुस्तकात अॅन्ड्री रॉबर्ट्स म्हणतात, “3 जून 1948 पर्यंत भारताला स्वातंत्र्य द्यावयाचे होते; पण लॉर्ड माऊंटबॅटन यांनी भारताचे स्वातंत्र्य व फाळणी याचे वेळापत्रक बदलले व आपल्याच कारकीर्दीत फाळणी करण्याची घाई केली”.
सिलीर रॅडक्लिफ यांना भारत-पाकिस्तान सीमेची आखणी करण्यास माऊंटबॅटन यांनी सांगितले होते. हे काम रॅडक्लिफ यांच्यावर सोपवण्यापूर्वी ते कधीच भारतात आले नव्हते. त्यामुळे त्यांना भारताची भौगोलिक स्थिती माहितीच नव्हती. अशा माणसाला 40 दिवसांत दोन राष्ट्रांच्या सीमेची आखणी करण्यास सांगितले होते. स्वत: रॅडक्लिफ यांनी असे म्हटले आहे की, “दोन राष्ट्रांच्या सीमेच्या आखणीसाठी मला दोन वर्षांचा कालावधी द्यावयास हवा होता, पण तो न देता 40 दिवसांत सीमा आखणीचे काम उरकण्यात आले.” माऊंटबॅटन यांची दुसरी चूक अशी की, सीमासंबंधीचा निर्णय सत्तांतरानंतर जाहीर करण्यात आला. रेडक्लिफ यांनी पंजाबमध्ये सीमा आखणी केल्याबरोबर त्याची घोषणा झाली असती तर ब्रिटिश लष्करी अधिकार्यांच्या देखरेखीखाली लोकसंख्येची अदलाबदल झाली असती व ब्रिटिश अधिकार्यांनी आपल्याकडे सत्ता असतानाच हे काम केले असते. प्रत्यक्ष सत्तांतर होण्याच्या आधी जर लोकसंख्येची अदलाबदल झाली असती तर सीमा भागात कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित झाली असती. ही खबरदारी माउंटबॅटन यांनी घेतली नाही म्हणून हा नरसंहार झाला, असे अॅन्ड्री रॉबर्ट्स या इतिहासकाराचे म्हणणे आहे.
भारताचे दोन तुकडे करून माउंटबॅटन हे इंग्लंड ला परत गेले. तिथे आपण काय पराक्रम केले ते त्यांनी लंडनमधल्या विशाल सभेत सांगितले. ते म्हणाले, “आम्ही लवकर फाळणी करण्यात यशस्वी झालो. एक माणूस फाळणीला राजी नव्हता; पण त्याला आम्ही दूर ठेवलं. फाळणीसाठी दोन लोकांना राजी करणं जरुरी होत. त्याशिवाय काँग्रेस वर्कींग कमिटी फाळणीला मान्यता देणार नव्हती. आम्ही कृष्ण मेनन यांना सोबतीला घेऊन नेहरूंना पटवलं. व्ही.पी. मेनन यांना हाताशी धरून सरदार पटेलांना राजी केलं. जो माणूस फाळणीला कदापि तयार होणार नव्हता त्या महात्मा गांधींना बाजूला ठेवण्यात आलं.” म्हणजेच फाळणीच्या निर्णयात गांधींना डावलण्यात आलं, अशा अर्थाचं माउंटबॅटन यांचं हे भाषण लिखित स्वरूपात आजही उपलब्ध आहे.
आज काही लोक अखंड हिदुस्थानाची भाषा बोलत असले तरी विचार करा की आज भारताच्या लोकसंख्येत मुस्लिमांची टक्केवारी 14.2 % आहे. जर फाळणी झाली नसती आणि अखंड भारत राहिला असता तर येथे मुस्लिमांची संख्या कमीत कमी 40 टक्के झाली असती. जर अखंड भारत असता तर त्यात मुस्लिमांना सामाजिक, शैक्षणिक, राजकीय अशा सर्वच गोष्टीत कमीत कमी 40 टक्के वाटा द्यावा लागला असता. फाळणी झाल्यामुळेच भारतात हिंदूंना राजकारण, सत्ता, प्रशासन, सरकारी व खाजगी नोकर्या, उद्योगधंदे, प्रसारमाध्यमे आणि इतर सगळ्या ठिकाणी किमान 90 टक्के वाटा मिळतो आहे. म्हणून आज हिंदू लोकांना जे काही अधिकार मिळत आहेत ते फाळणीमुळेच मिळत आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे. 1955 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी फाळणीबद्दल एक अतिशय महत्वाचं वक्तव्य केलं होतं की, “जर भारत अखंड राहिला असता, तर हिंदूंना मुसलमानांच्या दयेवर जगावे लागले असते. मुसलमान शासनकर्ती जमत बनली असती. जेव्हा फाळणी झाली; तेव्हा मला वाटले की, परमेश्वराने या देशावरील शाप काढून घेतला असून हा देश एकसंघ, महान व वैभवशाली बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.”
बरं हा फाळणीचा आरोप लावणार्या हिंदू महासभा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी फाळणी रोखण्यासाठी कवडीचे प्रयत्न केले नाहीत. ठोस प्रयत्न सोडा साधे आंदोलनही केले नाही की साधा निषेध नोंदवला नाही. फाळणी रोखण्याचा जर कोणता उपाय होता तर तो तुम्ही गांधी, नेहरू, पटेल, जिनांना का सांगितला नाही? फाळणी थांबविणे सोडा परंतु फाळणीवेळी संघाने व हिंदू महासभेने हिंदू-मुस्लिम वाद वाढवून फाळणीसाठी पोषक वातावरण निर्माण केले होते आणि आज तेच लोक अखंड भारताचा नारा लावतात. सावरकरांनी तर स्वतंत्र भारतात सामील न होता स्वतंत्र वेगळ्या राष्ट्राची घोषणा केल्याबद्दल त्रावणकोर (केरळ) राज्याचे तार पाठवून अभिनंदन केले होते. सरदार तारासिंगांनासुद्धा सावरकरांनी पत्र पाठवले की, पंजाब हे शिखीस्तान म्हणून वेगळं राष्ट्र घोषित करा. जूनागड व म्हैसुर हे स्वतंत्र राष्ट्र व्हावे अशीही सावरकरांची इच्छा होती. आणि आज त्यांचेच अनुयायी अखंड भारत पाहिजे म्हणून गळा काढतात.
गांधींनी फाळणी केली आणि गांधी फाळणी रोखू शकले नाहीत या दोन वाक्यांमधला फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. फाळणीमुळे गांधींची हत्या झाली असे जे लोक म्हणतात त्यांना विचारायला हवं की 1934 साली जेव्हा फाळणीचं कुठेच नाव नव्हतं, फाळणीचा विचारही देशात कुठेच नव्हता मग गांधींवर तेव्हापासून एक दोन नाही तर तब्बल 5 वेळा हल्ले का झाले? या हल्ल्यांमध्ये नथुराम गोडसे का सामील होता? फाळणीसाठी मुख्य जबाबदार असणारे, फाळणीची योजना आणणारे इंग्रज, फाळणीची उघडपणे आग्रही मागणी करणारी, फाळणीसाठी अडून बसणारी मुस्लिम लीग व डायरेक्ट ऍक्शन प्लॅन च्या माध्यमातून लाखो हिंदूंच्या कत्तली करणारे जीना यांच्याबद्दल साधा निषेधही व्यक्त न करणारे लोक फाळणीला कायम विरोध करणार्या महात्मा गांधींचा मात्र गोळ्या घालून खून करतात. *(‘मजबुतीका नाम गांधी’ या आगामी पुस्तकातून)*
✒️चंद्रकांत झटाले(अकोला)मो:;9822992666


