




🔹विविध सामाजिक उपक्रमांनी होणार खा. पवार साहेबांचा वाढदिवस साजरा
✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)
परळी(दि.9डिसेंबर):-राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली तथा नगर परिषदेचे गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली 11 व 12 डिसेंबर असे दोन दिवस शरदोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
यांतर्गत विविध सामाजिक उपक्रम राबविले जाणार असून, खा. पवार साहेबांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात मुख्यमंत्री स्वयंरोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या वाहनांचे वितरण, संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थींना मंजुरी पत्राचे वितरण, तसेच राष्ट्रवादी सेवा सप्ताहात नाव नोंदणी केलेल्या 200 विधवा महिलांना पिठाच्या गिरणीचे वाटप आदी उपक्रम ना. धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत राबवले जाणार आहेत.
सुप्रसिद्ध कलाकार मंगेश निपाणीकर यांनी खास तयार केलेल्या खा. पवार साहेबांच्या 20 हजार चौरस फूट तैलचित्र यानिमित्ताने परळी येथील तहसील कार्यालयासमोरील मैदानात पाहायला मिळणार आहे.
तर 12 डिसेंम्बर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभरात आयोजित केलेल्या व्हर्च्युअल रॅलीचे स्व. गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे व सायंकाळी 7 वा. वैद्यनाथ मंदिर परिसरात दीपोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या सर्व उपक्रमांना कोविड विषयक नियमांचे पालन करून उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण तात्या पौळ व शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले आहे.




