Home महाराष्ट्र विचारांचा विचारांनीच प्रतिकार व्हावा?

विचारांचा विचारांनीच प्रतिकार व्हावा?

126

अखिल भारतीय साहित्य संमेलनात संपादक गिरीश कुबेर यांच्या अंगा-तोंडावर शाई फेकली गेली. पुणे येथील संभाजी ब्रिगेडच्या संतोष गुंड आणि सतीश काळे या दोन युवकांनी त्यांच्यावर शाई फेकली. त्यानंतर समाजातील विविध स्तरांवरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. काही लोकांनी, राजकारण्यांनी विचारांना विचारांनीच उत्तर दिले पाहिजे. अशी शाई फेकणे चांगले नाही अशा प्रतिक्रिया दिल्यात. सामान्य माणसाला ही प्रतिक्रिया योग्य वाटण्याची शक्यता आहे. पण या देशात खरंच विचारांना विचारांनीच प्रतिकार होतो का? हेसुद्धा एकदा तपासून बघणे जरुरी आहे.

आज विचारांचा विचारांनीच प्रतिकार केला पाहिजे म्हणणार्‍यांना माझा एक सवाल आहे. काय नत्थु गोडसेने महात्मा गांधींच्या विचारांना विचारांनी प्रतिकार केला होता? की एका ८० वर्षांच्या निशस्त्र म्हातार्‍याला बंदुकीच्या गोळ्या घालून ठार केले होते? त्यावेळी तुम्हाला का त्या गोष्टीचा निषेध करावासा वाटला नाही? आज गिरीश कुबेरांवर पाळी आली म्हणून लगेच तुम्हाला भारतीय संस्कृती आठवणार? पण त्यावेळी तुमची भारतीय संस्कृती कुठे गेली होती ज्यावेळी सावित्रीबाई फुलेंवर शेण फेकल्या जात होतं? त्यांना रस्त्याने जातांना शिवीगाळ होत होती? त्यावेळी तुम्ही का त्या शेण फेकणार्‍यांना बोलला नाहीत की विचारांना विचारांनीच विरोध करायला हवा? महात्मा ज्योतिबा फुलेंवर मारेकरू धाडले गेले. महात्मा फुलेंनी कुणावर लाठ्या-कुर्‍हाडीने हल्ला केला होता काय? मग हे मारेकरू धाडणार्‍यांना तुम्ही का बोलले नाही की, विचारांचा विरोध विचारांनीच व्हावा? लाठ्या-कुर्‍हाडीने नको.

’रेनिसांस स्टेट्स; द अनरीटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकात गिरीश कुबेर यांनी छत्रपती संभाजी राजेंनी सत्तेसाठी आपल्या सावत्र आई सोयराबाईंची हत्या केली अशी खोटी बदनामी केली आहे. त्याचबरोबरच शिवरायायांच्या अष्टप्रधान मंडळातील महत्वाची मंडळी जी सोयराबाईंना मदत करत होती त्यांना हत्तीच्या पायी देऊन मारले असा आरोप केलेला आहे. पण यात ही महत्वाची मंडळी कशी स्वराज्यद्रोहात गुंतली होती आणि संभाजी राजेंवर विषप्रयोग सुद्धा ह्याच मंडळींनी केला होता हे लिहायला मात्र गिरीश कुबेर सोयीस्करपणे विसरलेत. ह्या बदनामी विरोधात संपूर्ण महाराष्ट्रातील विविध संघटना, सामान्य नागरिकांनी निषेध नोंदविला. हा बदनामीकारक मजकूर त्या पुस्तकातून वगळण्यात यावा याकरिता ६ महिन्यांपर्यंत लोकांनी कुबेरांना विनंती केली, ते लिखाण कसे खोटे आहे हे सबळ पुरावे देऊन प्रतिवाद केला परंतु गिरीश कुबेर यांनी ह्या लोकमताची कवडी दखल घेतली नाही. त्यावेळीच ह्या शिवप्रेमींना एखाद्या जाहीर मंचावर बोलावून वैचारिक चर्चा घडवून आणली असती तर खरं-खोटं तिथेच स्पष्ट झालं असतं, परंतु तसलं काहीही कुबेरांनी केलं नाही.

बरं छत्रपती शिवराय किंवा छत्रपती संभाजी राजे यांच्याबद्दल बदनामीकारक लिखाण केल्यानंतर जे लोक तोंडातून ब्र शब्द काढत नाहीत तेच लोक असे खोटे लिखाण करणार्‍यांवर शाई फेकली म्हणून जीवाचा आकांत करतात हे बघून आश्चर्य वाटत.अहो या घडामोडींमधील वाईट गोष्ट कोणती? या महाराष्ट्राच्या अस्मितेची बदनामी की ज्याने बदनामी केली त्याला काळे फासणे? ५ डिसेम्बरला कुबेरांवर ज्या युवकांनी शाई फेकली त्या युवकांशी बोलतांना काही वृत्तवाहिनीचे अँकर लोक आधी त्या पुस्तकाचे नाव सांगा म्हणून अडून बसले. ’रेनिसांस स्टेट्स; द अनरीटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ हे इतकं लांबलचक इंग्रजी नाव त्या युवकांना वेळेवर आठवले नाही म्हणून काय गिरीश कुबेर यांनी लिहिलेला खोटा बदनामीकारक मजकूर खरा ठरतो? पुस्तकाचे नाव आठवले नाही यापेक्षा पुस्तकातील बदनामीकारक मजकूर वगळणे महत्वाचे आहे हे काय ह्या वृत्तवाहिन्यांना कळत नसेल? पुस्तकाचे नाव माहित नसतांना ह्या लोकांनी शाई फेकली हे दाखविणार्‍या वृत्तवाहिन्या जेव्हा ह्या महापुरुषांची बदनामी होत असते तेव्हा मात्र मूग गिळून गप्प बसलेल्या असतात.

आताही ह्या वृत्तवाहिन्यांनी ज्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शाई फेकली त्या संभाजी ब्रिगेड च्या प्रतिनिधींना आणि गिरीश कुबेरांना एकत्रितपणे चर्चेला बोलवावं आणि त्या बदनामीकारक मजकूराबद्दल दोन्हीकडचे पुरावे सादर करायला लावून चर्चा घडवून आणावी. या जाहीर चर्चेतून लोकांनाही कळू द्या कोण खरं कोण खोटं ते. ह्या महापुरुषांच्या बदनामी विरोधात छत्रपती शिवरायांचे नाव घेऊन निवडून आलेले लोकप्रतिनिधी एक शब्द बोलत नाहीत. अशा लेखकांच्या विरोधात कारवाई होण्याऐवजी ह्यांना जाहीर राजाश्रय मिळतो त्यामुळे अश्यांची हिम्मत वाढत चालली आहे. अशा प्रवृत्ती वेळीच समाजातील सर्व स्तरांतून ठेचल्या गेल्या तर हे विकृत बियाणं नामशेष व्हायला वेळ लागणार नाही. परंतु लोकप्रतिनिधी व शासनाला सुद्धा अश्या प्रकरणांमध्ये जराही हालचाल करावीशी वाटत नाही हे अत्यंत क्लेशदायक आहे.

याच नाशिकच्या अ.भा.साहित्य संमेलनात सावरकरांच्या नावाने असलेल्या मंचावर एका विकृत साहित्यिकाने तर गांधी-नेहरुंना मंचावरुनच ‘मादर**’ अशी भयंकर शिवी दिली. त्यावेळी तीथे उपस्थित एका युवा प्रकाशकाने व त्याच्या सहकार्‍यांनी त्या विकृत साहित्यिकाला प्रखर विरोध केला आणि हा प्रकार तीथेच थांबला. परंतू यावेळी विचारांचा विरोध अश्लील शिवीगाळाने का? असा प्रश्न त्या साहित्यिकाला कुणीच केला नाही.विचारांना विचारांनीच विरोध केला पाहिजे असं ह्या प्रसंगी ज्यांना ज्यांना आठवत आणि ज्यांना वाटत की महात्मा गांधी, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले ह्यांचा फार जुना इतिहास आहे. त्यावेळी आम्ही नव्हतो. त्यांना पुन्हा माझा प्रश्न आहे की, गोविंद पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश आणि दाभोळकर यांच्या विचारांना का विचारांनी विरोध झाला नाही? का ह्या लोकांना गोळ्या घालून ठार मारलं गेलं? इतिहास विकृत करणाऱ्यांवर शाई फेकली तर तुमच्या जीवाचा तिळपापड होतो मग संपूर्ण आयुष्य समाजप्रबोधन करणाऱ्यांना गोळ्या घातल्यानंतर तुमच्या मनाला काय गुदगुल्या होतात काय? त्यांना मारल्यानंतर सुद्धा ’मर गयी साली कुतीया’ असं बोललं गेलं. का? ह्या विचारांचा विरोध बंदुकीने करणार्‍या नराधमांना पण जरा सांगा की गड्यांनो, की विचारांना विचारांनीच विरोध व्हावा…

✒️चंद्रकांत झटाले(अकोला)मो:-९८२२९९२६६६

Previous articleडॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या माध्यमातून अभिवादन
Next articleबीड शिवसेना जिल्हाप्रमुख पदाच्या ‘युद्धात’ गेवराईचीच ‘जीत’ होण्याची शक्यता!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here