




✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)
नाशिक(दि.4डिसेंबर):-“सावित्री यासाठी सावित्री झाली कारण तिने स्त्री शिक्षणाचा लढा दिला” लोक-शास्त्र सावित्री नाटकातील हे संवाद गतकाळात नेऊन तिच्या संघर्षाची जाणीव करून देतात. परंतु सावित्रीबाई फुलेंच्या शिक्षणाच्या संघर्षाच्या पुढे आपल्याला हे नाटक घेऊन जाते. सावित्रीबाई फुलें च्या पुढाकाराने आज करोडो स्त्रिया शिक्षित झाल्या, परंतु त्यातील एकही स्त्री सावित्री नाही झाली का ? हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाच्या उत्तराची दिशा हे नाटक देते. वाचण्याच्या पलीकडे सावित्रीला वर्तमानात शोधणे, तिला आपल्या आत रुजवणे हा संकल्प हे नाटक आपल्या समोर मांडते.
आज कितीही प्रगत झालो असलो तरीही मानसिक गुलामी अजूनही आपल्यात आहे त्याच्या बेड्या तोडण्याची ताकद हे नाटक देते. ज्या थोर विचारकांनी पुरोगामी महाराष्ट्र घडविला त्यांना केवळ मूर्ती पूजेत अडकवायचे की त्यांचे विचार अंगिकरायचे,त्यांचे ‘आदर्श आणि मूल्य’ हे आपण आपल्या आयुष्यात कुठे आणि कसे उतरवत आहोत. त्यांच्या आदर्शांना जीवन जगत असताना, आपल्या काळात आणि समाजात कसे रुजवत ही जाणीव हे नाटक देऊन जाते.
1831 पासून आतापर्यंतच्या काळाचा आलेख घेतला तर लक्षात येईल, त्या काळापासून सुरू झालेले सांस्कृतिक प्रबोधन जागतिकीकरणाने संपवले आहे. सावित्रीच्या प्रतिरोधाला प्रचारकी व्यक्तिवादाचे स्वरूप देऊन अलगदपणे सर्वसामान्य केले.सावित्रीचा जो प्रतिरोध होता त्याची ताकद संपवली.आता हा प्रतिरोधाचा न्याय पताका घेऊन, “थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांत” “लोक- शास्त्र सावित्री” या नाटकाच्या माध्यमातून पुन्हा सावित्रीच्या महत्वाला, तिच्या विचाराला जनमानसात जागवत आहे.
मराठी रंगभूमीचा वैचारिक प्रगतीशीलतेचा वारसा पुढे घेऊन जाणारे”थिएटर ऑफ रेलेवन्स” नाट्य सिद्धांताचे रंगकर्मी अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर,कोमल खामकर,तुषार म्हस्के, सुरेखा साळुंखे, नृपाली जोशी, प्रियंका कांबळे, संध्या बाविस्कर, मोरेश्वर माने, रूपवर्धिनी सस्ते, स्वाती वाघ, संकेत आवळे यांनी माणुसकीचा समाज निर्माण करण्यासाठी , न्यायसंगत व्यवस्थेच्या निर्माणाचे क्रांतिकारी सूत्र घेऊन, नवी पिढी घडवण्याचा संकल्प केला आहे. 1 डिसेंबर 2021, बुधवार रोजी, संध्याकाळी 6.00 वाजता रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित – दिग्दर्शित युगपरिवर्तक नाटक ” लोक – शास्त्र सावित्री ” हे नाटक परशुराम साईखेडकर नाट्यगृहात हाऊसफुल्ल प्रेक्षकांच्या उपस्थितीत संपन्न झाले.




