



✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि.3डिसेंबर):-ब्रम्हपुरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये प्रधानमंंत्री आवास योजने अंतर्गत सन 2020-2021 मध्ये अनेकांना शासनाच्या वतीने घरकुल मंजूर करण्यात आले. यात अनेक गावांतील लाभार्थ्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत घराचे बांधकामास सुरूवात केली. यात मनरेगा अंतर्गत अकुशल कामगारांमार्फत घरकुलांची कामे करण्यात आली. परंतु गेल्या कित्येक दिवसांपासून मनरेगा अंतर्गत हजेरी पत्रक ऑनलाईन स्वरूपात निर्गमित न झाल्याने अकुशल कामगारांना त्यांनी केलेल्या श्रमाचे पैसे मिळत नसल्याने सदर कामगारांवर उपासमारीची पाळी आली आहे.
सदर मनरेगा अंतर्गत काम केलेल्या मजूरांची हजेरी पत्रकावर ऑनलाईन स्वरूपात मजूरांची नोंदणी सुरू होत आहे, परंतु प्रत्यक्षात मनरेगाच्या मजूरांना मोबदला देण्यासाठी रोजगार सेवकांना आवश्यक असलेले हजेरी पत्रक शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्राप्त होत नसल्याने अकुशल कामगारांचे पैसे हजेरी पत्रकाअभावी मिळणे बंद झाले आहे. शिवाय कोरोना संकटामुळे मजुरांना पैशा अभावी कुटुंबाचा गाडा हाकणे कठीण झाले आहे. परिणामी या अकुशल कामगारांवर उपासमारीची पाळी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
त्यामुळे मनरेगातील अकुशल कामगारांचे हजेरी पत्रक शासनाने निर्गमीत करून अकुशल कामगारांना दिलासा देण्याची मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रा.अमृत नखाते चिमूर विधानसभा क्षेत्र यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई, हसन मुश्रीफ ग्रामविकास कॅबिनेट मंत्री, संदिपान भुमरे रोजगार हमी कॅबिनेट मंत्री व जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना उपविभागीय अधिकारी संदिप भस्के यांच्या मार्फत प्रेषित करण्यात आले.
यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख डॉ. रामेश्वर राखडे, केवळराम पारधी सरपंच सोंदरी तथा उपतालुका प्रमुख ब्रम्हपुरी, शामराव भानारकर माजी शहरप्रमुख ब्रम्हपुरी, रमाकांत अरगेलवार ब्रम्हपुरी, गुलाब बागडे विभाग प्रमुख, गणेश बागडे आदी. शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.


