Home बीड ” जागतिक दिव्यांग दिन “

” जागतिक दिव्यांग दिन “

299

इ.स.१९९२ पासून ३ डिसेंबर हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघातर्फे दिव्यांगांचा दिवस म्हणून घोषित झालेला आहे.दिव्यांगत्त्व हे संयुक्त राष्ट्रांच्या सहस्त्रकीय प्रगती योजनांतील एक महत्त्वपूर्ण उद्दिष्ट असून या समस्येवर सुवर्णमध्ये गाठण्याचा प्रयत्न चालू आहे.त्यासाठी इ.स.१९९२ पासून ३ डिसेंबर हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघातर्फे दिव्यांगांचा दिवस म्हणून घोषित झालेला आहे.शारीरिक किंवा मानसिक त्रुटीद्वारे विकलांंग बनलेल्या समाजातील घटकांच्या समस्या समजावून घेता याव्यात,म्हणून या दिवसाची योजना आहे.दिव्यांगांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांच्या उद्धारासाठी हातभार लागावा तसेच समाजातील अन्य लोकांना प्रेरणा मिळावी म्हणून हा दिवस पाळला जातो.विविध उपक्रमांद्वारे निधी उभारला जावा म्हणून या दिवसाची योजना आहे.संयुक्त राष्ट्रसंघातर्फे १९८३ ते १९९२ हे दशक दिव्यांगांसाठी अर्पण करण्यात आले होते व त्याद्वारे जगभरच्य सरकारांना दिव्यांगांच्या उद्धारासाठी मोहिमा राबविण्यास भाग पाडले होते.दशक अखेरीस तीन डिसेंबरची निवड झाली होती व १९९२ मध्ये पहिला ‘ दिव्यांग दिन’ साजरा झाला होता.

आज जगातली दहा टक्के लोकसंख्या,म्हणजेच सुमारे ६५ कोटी लोक या ना त्या रूपाने दिव्यांग आहेत.जागतिक आरोग्य संघटनादेखील दिव्यांग बांधवाच्या जीवनाची गुणवत्ता वाढावी म्हणून प्रयत्नशील असते.त्यासाठी विभागीय,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध उपक्रम हाती घेतले जातात.हा दिवस साजरा करताना चार महत्त्वाच्या पायऱ्या लक्षात घ्यायला हव्यात.१) शाळा,कॉलेज,सरकारी – खाजगी -निमसरकारी संस्थांतर्फे आयोजित उपक्रमात सहभागी होणे.२) विविध प्रचार मोहिमा आयोजित करून दिव्यांगांच्या प्रश्नांना वाचा फोडणे.त्यांना सहकार्याचे अभिवचन देणे.३)दिव्यांग बांधवांच्या ठायी असलेल्या छुप्या कलागुणांचा साक्षात्कार होण्यासाठी उत्सव – मेळावे भरविणे आणि त्यांची जगण्याची उभारी वाढविणे.४)दिव्यांगांच्या उद्धारासाठी जागतिक स्तरांवरची नियमावली कटाक्षाने पाळली जात नसेल तर त्यासाठी काटेकोरपणे दक्षता घेऊन ते मार्गी लावणे.आज ३ डिसेंबर म्हणजे जागतिक दिव्यांग दिवस.हा दिव्यांग दिवस म्हणजे दिव्यांगांच्या अभिमानाचा दिवस होय.

‘दिव्यांगत्व म्हणजे काय?’ मानसिक स्थिती हे खरं दिव्यांगत्व असते.आपण दृष्टीकोन बदलून इतरांना मदत करू या.याबाबतच्या प्रतिकूलमतांचा अंत करण्याचा प्रयत्न करू या आणि दिव्यांग लोकांसाठी आपल्या मनाचे दरवाजे उघडू या.दिव्यांग लोकांच्या भावना समजून घ्या,त्यांचे म्हणणे ऐकून घ्या.त्यांना मदत करा.त्यांच्या बरोबर मदतीचा हात ठेवून त्यांच्या सोबत फिरायला जा,खरेदीला जा.त्यांच्याशी मैत्री करा.आपल्या सभोवतालचे वातावरण दिव्यांगांच्या प्रती संवेदनशील करायला पाहिजे.समाजात या दिव्यांगांना प्रतिष्ठा मिळायला हवी कारण त्यांच्यापासून आपल्याला वैयक्तिक दुखण्यांना सांभाळून कसे जगायचे हे शिकायला मिळते.”दिव्यांगांना दिव्यांगत्व हे शाप न वाटता ते वरदान वाटले पाहिजे” अशा प्रकारची कामगिरी करण्यासाठी इतरांनी कटिबद्ध व्हायला पाहिजे.दिव्यांग बांधवानी आपली निराशा झटकून शासनामार्फत मिळणाऱ्या विविध योजनांचा लाभ घ्यावा व “मुकम् करोति वाचालम्,पंगूम् लघयते गिरीम्” ही म्हण प्रत्यक्षात आणून दाखवावी.

मतिमंद आणि बहुविकलांगांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते.अशा समस्या निर्माण होऊ नयेत म्हणून त्यांचा “आवाज” समाजाने मनापासून ऐकण्याची आवश्यकता आहे.त्यांना न्याय मिळावा,त्यांचे हक्क त्यांना मिळावेत,यासाठी प्रशासकीय पातळीवरही योग्य प्रयत्न व्हायला हवेत.मतिमंदांचा ‘आवाज’ मनापासून ऐका.बहुविकलांग व्यक्तींना मदत मिळत नाही,उपकरणे मिळत नाहीत,कर्ज वेळेवर काढता येत नाही,यांसह त्यांच्या इतर अनेक समस्या आहेत.त्या जाणून घ्यायला हव्यात.त्यासाठी आपणाला त्यांच्यातलेच एक व्हायला हवे.त्यांच्या समस्या एका व्यासपीठावर आणून त्या प्रश्नांवर गांभीर्याने चर्चा करायला हवी,असे मला वाटते.बहुविकलांग व्यक्तींना मदत करण्यासाठी अनेक संस्था पुढे येतात.मनोभावे कामही करतात.पण,काही संस्था स्वत: मोठे कसे होऊ,याचाच विचार करतात.ही प्रवृत्ती कमी व्हायला पाहिजे.तरच खऱ्याअर्थाने जागतिक दिव्यांग दिन साजरा केल्याचा आनंद होईल.असाध्य ते साध्य – मित्रांनो,३ डिसेंबर हा ‘ जागतिक दिव्यांग दिन ’ म्हणून साजरा केला जातो.त्यानिमित्ताने काही प्रेरणादायी दिव्यांग व्यक्तींची माहिती करून घेऊ या.या सर्व व्यक्तिचित्रांमध्ये एक धागा समान आहे.या व्यक्तींनी शारीरिक व्याधींवर मात करून स्वत:चे सामर्थ्य सिद्ध करून दाखवले आहे.हेलन केलर – १८८० साली जन्मलेल्या हेलन केलर यांच्यावर मेंदूज्वरामुळे बालपणीच मूक-बधिरत्व आणि अंधत्व ही दोन्ही संकटे एकत्रितरीत्या कोसळली.यापैकी कोणतेही एक दिव्यांगत्वसुद्धा सामान्यांचे जीवन उद्ध्वस्त करायला पुरेसे असते.

परंतु या असामान्य स्त्रीने शिक्षिकेच्या मार्गदर्शनाखाली आपले उच्चशिक्षण डोंगराएवढय़ा अडचणींना तोंड देत पूर्ण केले.हेलन अमेरिकन विद्यापीठातील प्राध्यापिका,लेखिका आणि समाजसेविका म्हणून विश्वविख्यात झाल्या.लुईस ब्रेल – वयाच्या तिसऱ्या वर्षी झालेल्या अपघातामुळे आलेल्या अंधत्वाने खचून न जाता यांनी बोटांच्या स्पर्शाने वाचली जाणारी ब्रेल लिपी तयार करून अंधांसाठी ज्ञानाचा प्रकाश खुला केला.या बहुमोल लिपीचा उपयोग आज जगभरातील अंध व्यक्तींना होत आहे.सुधा चंद्रन – एका दुर्दैवी अपघातात आपला एक पाय गमावल्यावर जयपूर फूटच्या साहाय्याने ती पुन्हा उभी राहिली आणि नुसतीच उभी न राहता तिने शास्त्रीय नृत्य आणि अभिनयाच्या जोरावर जागतिक कीर्ती संपादन केली.ऑस्कर पिस्टोरियस – पोटऱ्यांच्या खाली पाय नसलेला हा दक्षिण अफ्रिकेचा ब्लेड रनर – धावपटू.हा धावपटू दिव्यांगांच्या ऑलिम्पिकमधील विश्वविक्रमासहित १००,२०० व ४०० मीटर रनिंगमधील सुवर्णपदक विजेता आहेच,शिवाय २०१२ साली झालेल्या लंडन ऑलिम्पिकसारख्या जागतिक स्पर्धेत ४०० मीटर स्पर्धेसाठी पात्र ठरून आपण अव्यंग लोकांपेक्षा कमी नाही,हेही सिद्ध केले.स्टीफन हॉकिंग – या महान शास्त्रज्ञाला स्नायूंचा असा असाध्य आजार झाला की,ज्यामुळे त्यांना कुठलीही हालचाल करणे जवळजवळ अशक्य झाले.

तरीही त्यांनी तीक्ष्ण बुद्धिमत्तेच्या जोरावर भौतिकशास्त्रातील सृष्टीची निर्मिती आणि कृष्णविवर यावरील संशोधनाने नावलौकिक मिळवला.बी.एस.चंद्रशेखर – भारतीय क्रिकेटला परदेशात विजयाची चटक लावणारी चंद्रशेखर – बेदी -प्रसन्ना – वेंकटराघवन् ही फिरकी गोलंदाजांची चौकडी सर्वपरिचित आहेच.यातील चंद्रशेखर हा सर्वात भेदक लेग स्पिनर होता.चंद्रशेखर यांचा उजवा हात पोलिओग्रस्त होता.आपल्या व्यंगावर मात करून त्याचाच उपयोग त्यांनी फिरकी गोलदांजीसाठी करून भारतीय क्रिकेटच्या इतिहासात मानाचे स्थान मिळवले.मन्सूर अली खान – टायगर पतौडी यांनी कार अपघातात आपला उजवा डोळा गमावल्यावरही जिद्दीने भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवले.एवढेच नव्हे तर कप्तानपदाची धुराही सांभाळली.केवळ एकाच डोळ्याने दिसत असूनही उत्तम क्षेत्ररक्षक आणि भरवशाचा फलंदाज असा लौकिकही मिळवला.वॉल्ट डिस्ने,ग्रॅहम बेल,एडिसन, आइनस्टाइन यांचे जीवनकार्य बघता यांना स्लो लर्निंग ही व्याधी होती यावर तुमचा विश्वास बसतो का? पण ध्येय समोर असेल आणि ते साध्य करण्याची जिद्द असेल आणि आपण जे काही करत आहोत त्यावर निष्ठा असेल,तर कुठलेही काम असाध्य नाही.

चला तर मग……दिव्यांग बंधू – भगिनींनी दिव्यांगत्वामुळे खचून न जाता वरील दिव्यांगत्वावर मात केलेल्या आदर्श व्यक्तींच्या कार्याचा वसा घेवून आपल्या जिवनात एक चांगले व आदर्शवत कार्य करुन इतर दिव्यांगांनाही प्रेरणा देवू या….तरच आजचा ३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन खऱ्याअर्थाने साजरा होईल.

✒️राजेंद्र लाड(जिल्हाध्यक्ष,शासनमान्य म.रा.दिव्यांग कर्मचारी संघटना बीड)
मो.९४२३१७०८८५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here