



✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)
आष्टी(दि.1डिसेंबर):-जागतिक एड्स दिनानिमित्त ०१ डिसेंबर २०२१ रोजी आष्टी येथील भगवान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘जनजागरण’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.भागिनाथ बांगर,प्रमुख पाहुणे उपप्राचार्य डॉ.ज्ञानदेव वैद्य व प्रमुख मार्गदर्शक म्हणून हिंदी विभाग प्रमुख तथा राष्ट्रीय सेवा योजनेचे माजी कार्यक्रम अधिकारी डॉ.आप्पासाहेब टाळके हे उपस्थित होते.
कार्यक्रमाला उपस्थित राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व इतर कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना डॉ.आप्पासाहेब टाळके यांनी जागतिक एड्स दिन साजरा करण्यामागचा उद्देश स्पष्ट करून या महाभयंकर रोगाची लक्षणे,कारणे,उपाय याविषयीच्या गैरसमजावर सविस्तर माहिती दिली.
अध्यक्षीय समारोप करताना डॉ.भागिनाथ बांगर यांनी स्वयंसेवकांना असे आवाहन केले की,या रोगाचे सर्वाधिक रुग्ण असणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र एक राज्य आहे.याविषयी जनजागरण फार महत्त्वाचे आहे आपण सामाजिक जबाबदारी म्हणून ते कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो.याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.ज्ञानदेव वैद्य व डॉ.बाबासाहेब झिने यांनीही समयोचित विचार मांडले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन कार्यक्रमाधिकारी प्रा.श्रीरंग पवार यांनी तर आभार कार्यक्रमाधिकारी डॉ.रामदास कवडे यांनी मानले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.काकासाहेब सोले,प्रा.श्रीकांत धोंडे व राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.


