Home महाराष्ट्र मुबई कोस्टल रोड – रस्ता की पूल?

मुबई कोस्टल रोड – रस्ता की पूल?

100

आगरी कोळी भंडारी ओबीसींचे अस्तित्वांचा प्रश्न? निकराचा लढा!

महाराष्ट्रात एकीकडे ओबीसी राजकीय आरक्षण,नोकरी आणि शिक्षणातील आरक्षणात उच्चवर्णीय जातींची घुसखोरी?.ओबीसी आरक्षणाला होणारा उच्चवर्णीय जातींचा विरोध या प्रश्नावर रणकंदन माजले आहे.मुबंईत खूप अगोदर पासून व्यापारी शहर म्हणून एक वेगळी मानसिकता सर्वत्र पहायला मिळते.जेथे उच्चवर्णीय राजकारणी,कलाकार प्रशासक,वकील, बिल्डर धर्मगुरू या प्रतिष्ठित लोकांनी मच्छीमारांच्या अस्तित्वाला सतत नाकारून,या भोळ्या लोकांवर आपली “सांस्कृतिक दहशत” निर्माण केली आहे.
मागासवर्गीय आरक्षण यावर बोलणारी महिला नेता किंवा पुरुष नेता येथल्या 200 गावठाणात शोधूनही सापडत नाही?.यातील दुसरा दुष्परिणाम म्हणजे मुळात मागासवर्गीय असलेले आगरी कोळी भंडारी हे ओबीसी लोक थेट उच्चवर्णीय ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या जातींची आरक्षण विरोधी भूमिका मांडत आहेत.ओबीसी आरक्षण विरोधी असलेल्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात आपला राजकीय मोक्ष आणि मुक्ती शोधणाऱ्या आगरी कोळी ओबीसी नेतृत्वाला “कपाळमोक्षच” मिळाला आहे?

मा लीलाधर डाके,मा गणेश नाईक,मा अनंत तरे ही फार बलाढ्य भूमिपुत्र सागरपुत्र मंडळी आज कुठे आहेत? आणि माधुकरी मागणारे मनोहर पंत जोशी (ब्राह्मण) कुठे? मा एकनाथ शिंदे (मराठा) मा नारायण राणे (मराठा) कुठे?रिक्षा चालक,कोंबडी पालक जेथे मुख्यमंत्री आणि नगर विकास मंत्री होतात? तेथे मच्छिमार सागरपुत्र आगरी कोळी भंडारी का उध्वस्त होत आहेत? हा आपल्या नशिबाचा आणि प्रारब्धाचा दैवाचा खेळ नाही? तर उच्चवर्णीय मनुवादी राजकीय मानसिकता ओबीसी मागास वर्गीयांच्या शोषणाचे जितें जागते उदाहरण आहे. अर्थात कॉग्रेस राष्ट्रवादी या मराठा मालक असलेल्या,भाजपा या ब्राह्मण वैश्य मालक आणि शिवसेना या सीकेपी मालकांच्या पक्षात आपले जीव कसे वाचवायचे? हे ओबीसी नेतृत्वाने जाणावे या चागल्या हेतूने हे जातवास्तव मी मांडले आहे.
“आम्ही जात पात मानत नाही !” आरक्षण या कुबड्या आहेत ! या शिवसेना प्रमुखांच्या ओबीसी विरोधी,आरक्षण विरोधी भूमिका आतातरी आम्ही समजून घेतल्या पाहिजेत.मराठा आरक्षणाचा विषय येताच मा मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, आपले पिताश्री बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी बेईमानी करून मराठा आरक्षणाला पाठींबा देता?याचा अर्थ सीकेपी ठाकरे परिवार नेहमीच ओबीसी सागरपुत्रांच्या विरोधात होते.आज आहेत.

उच्चवर्णीय मनुस्मृती चे शूद्र ओबीसी विरोधी परंपरागत आदेश पाळीत होते ही सिद्ध झालेली गोष्ट आहे.शिवसेनेची महानगर पालिका समुद्रात कोस्टल रोड उभारून मच्छीमारांचे अस्तित्व संपवित असताना सामान्य मच्छिमार, हिंदुत्ववादी राजकारणाला घट्ट मिठी मारून बसला आहे.हे सारे रामायण आणि महाभारत येथे कशाला? अशा कमेंट या लेखावर उद्या वॉट्सप फेसबुक वर येणारच आहेत.अर्थात अशा प्रकारच्या कट्टर हिंदुत्ववादी आगरी कोळी भंडारी ओबीसी बांधवांच्या प्रबोधनासाठीच हा लेख आहे.रामायणात शिक्षण घेऊ पाहणाऱ्या शंभूक या शूद्र ओबीसी विद्यार्थ्याला ब्राह्मणाच्या मार्गदर्शनाखाली ठार करणारे क्षत्रिय श्रीराम वर्तमान राजकारणात ओबीसी शिक्षण आरक्षणाचा बळी घेत आहेत? आणि कोस्टल रोड मध्ये ओबीसी मच्छीमारांच्या व्यवसाय, घरा गावठाणांचा सर्वनाश करीत आहेत का? यावर खुली चर्चा व्हावी!महाभारतात गुरुदक्षिणा म्हणून धनुर्विद्येत महत्वाचा अवयव असलेला अंगठा कापून घेणारे गुरू द्रोणाचार्य आदिवासी कोळी बांधवांचे परंपरागत शत्रू आहेत.राज्य आणि देशाच्या शिक्षण प्रशासन आणि आरक्षण यात आजही विरोधाची भूमिका घेत असावेत का?या अर्थाने रामायण महाभारत या महाकवितांचा अभ्यास आगरी कोळी भंडारी साहित्यिक प्राध्यापक आणि विचारवंतांनी करावा?कोस्टल रोड मध्ये शासकीय परवानग्या मिळाल्यास ते शासनाचे यश आहे असे गुगल युट्युब वर मांडले गेलेय.

यात मच्छीमारांची बाजू मांडणारे वकील पर्यावरण वादी यांची जात कोणती होती? कोळीवाडे गावठाणे यांचा एसआरए व्हावा म्हणून गावठाण प्रस्तावच करू नका असे आत्मघाती मार्गदर्शन करणारे आर्किटेकत कोण आहेत? सायन कोळीवाड्याचे झोपडपट्टी SRA असे नामकरण करून तो उध्वस्त करण्याचे पातक करणारा आर्किटेकत /बिल्डर कोणत्या जातीचा आहे? मासळी मार्केट बिल्डरला विकण्यासाठी ना हरकत पत्रे लिहिणारी मच्छिमार महिला तिचे गुरू आणि मच्छिमार विरोधी शिवसेना यांची जात कोणती?. आगरी कोळी भंडारी ओबीसी बांधवांनो ही चर्चा मीच सुरू केलेली आहे असे नाही तर? आदरणीय जगन्नाथ कोठेकर,Adv जनार्दन पाटील,लोकनेते दि बा पाटील यांनी त्यावर लाखो भाषणे केलीत. मुबंई चे ज्येष्ठ आगरी बांधव,माझे मार्गदर्शक मा सुरेश पाटील,मा प्रभाकर गावंड हे या ऐतिहासिक सभांचे साक्षीदार आहेत.आम्ही ओबीसींना शब्दांचे अर्थ शोधावेच लागतील नाहीतर मोठा अनर्थ होऊ शकतो.कोस्टल रोड की सागरी सेतू?. हा शब्दखेळ समजून घ्या! आज कोर्टातील याचिका हरल्या म्हणून, उच्चवर्णीय याचिका कर्त्याना दुःख झालेय असे कुठेच दिसत नाही.
दुसरीकडे मच्छीमारांच्या समस्या आकाशाला भिडत आहेत.त्यांचा आक्रोश कोळीवाड्यात वाढत असताना एक एक वकील,एक एक पर्यावरण वादी,एक एक आर्किटेकत बाजूला सरत आहे.त्यांचे समर्थक मच्छिमार दलाल नेते सत्य उघड होत आहे ? या भीतीने कोळीवाडे सोडून लोणावळ्यात बंगले बांधत आहेत. कुठून येतो हा पैसा? याचा शोध घ्या.हे सारे असले तरी आम्ही समुद्र सोडायचा नाही.शेवटच्या स्वासापर्यंत लढायचे आहे.

महाराष्ट्रातले समस्त पत्रकार साहित्यिक याना माझा प्रश्न आहे.रस्ता आणि पूल यात फरक आहे की नाही? कोल्हापूर येथे आलेला पूर हे रस्त्याच्या भरावा मुळे आलेले संकट होते.असे निरीक्षण नोंदविले गेलेय. उन्हाळ्यात न दिसणारे छोटे नाळे हे पावसाच्या पाण्याच्या हक्कांचे रस्ते असतात.त्यावर भराव करणे म्हणजे पाण्याचा रस्ता अडविणे नाही का? पुलास जास्त खर्च येतो म्हणून पाण्याचा रस्ता आडविणारे आर्किटेकत बिल्डर यांच्या शहाणपणाची किंमत कोल्हापूरकर लोकांनी ओळखली आहे.मुबंईत जेथे कोस्टल रोड होतोय.छोट्या आदित्य ठाकरेंचे ते स्वप्न आहे.कोस्टल रोड बांधला जातोय त्याच्या खाली कार्टून मधला खळ खळ वाहणारा झरा नाही?तो साऱ्या छोट्या मोठ्या नद्यांचा बाप दर्यासागर आहे. त्याला रोज भरती ओहोटी येते.मच्छीमारांच्या भाषेत या सागरप्रवाहाला “करंट” असतो. तो पावसाळी पुरापेक्षा जास्त धोकादायक असतो हे पाण्यात बोट चालवणाऱ्या मच्छीमारालाच कळते.तेथे पाण्याचा रस्त्याचा अधिकार राखून “पूल” बांधू शकतो. भरावचा कोस्टल रोड नाही? अर्थात वर्तमान ब्राह्मण मराठा राज्यकर्त्यांना ज्यांना समुद्रात पोहता येतेय त्यांनी मच्छिमार बांधवा सोबत घेऊन सागरी प्रवाहांचा करंट अनुभवून घ्यावा.

नवी मुबई विमानतळ प्रकल्पास लोकनेते दि बा पाटील यांचे नाव देण्यासाठी आलेल्या आगरी कोळी ओबीसी महासागराच्या करंट मध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या नावासाठी चाललेल्या सरकारी बाळ हट्टाच्या ठिकऱ्या उडाल्या. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे,सिडको एमडी संजय मुखर्जी यांच्या डायरीत या सरकारी पराभवाच्या नोंदी सापडतील.अर्थात नदीवर पूल तसाच सागरातही पूल असावा? भरावाचा रस्ता नको.कोस्टल रोड हा पूल नाही रस्ता आहे. मच्छिमार म्हणून माझे म्हणणे समुद्रात पूल आणि रस्ताही नकोच .
आधुनिक बंदरे बाधा,आधुनिक बोटी बांधून जलवाहतूक सेवा सुरू ठेवा.खर्चही कमी आणि सागरी पर्यावरणाचा मच्छिमार व्यवसायाचा न्याय विचार आदरही राखला जाईल.

अगदीच पर्याय नसेल तर भु समुद्र कायदा 2013 नुसार चार वर्षांची नुकसान भरपाई प्रत्येकी स्त्री पुरुष पंधरा लाख रुपये रोख.विकास कामात पन्नास टक्के वाटा.पूर्वसन म्हणून आधुनिक बोटी,जाळी बंदरे मिळायला हवीत.पुनर्स्थापना म्हणून 200 कोळीवाडा गावठाणे यांचे जमीन मालकी अधिकार ,स्वयंविकास यासाठी मोफत कर्ज सुविधा!शिक्षण नोकरी यात प्रकल्पग्रस्त आरक्षण देण्यात यावे.हे नव्या भु समुद्र संपादन कायद्याने शक्य आहे.मच्छिमार बांधवांनी याचा अभ्यास करूनच लढ्यात उतरावे.निसर्ग न्याय सर्वश्रेष्ठ आहे.अंतिम सत्य आहे!हे एकविरा पुत्र भगवान बुद्ध दोन हजार वर्षांपूर्वीच जगाला सांगून गेले.आपणही यातून काही बोध घ्यावा.प्रबुद्ध व्हावे,शहाणे व्हावे!

✒️सुलोचनापुत्र:- राजाराम पाटील(उरण रायगड)सागरी पर्यावरण सागरी हालचाली आणि मच्छिमार सागरी हक्कांचे अभ्यासक)8286031463

Previous articleनात्याला काळिमा; रक्ताचं नातं विसरून लहान बहिणीवर सख्ख्या, चुलत भावांनी केला बलात्कार
Next articleनवीन शिक्षण धोरण 2020 च्या विरोधात सम्यक विध्यार्थी आंदोलनातर्फे शिक्षण हक्क परिषदेचे आयोजन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here