Home महाराष्ट्र कामातून सेवा निवृत्त व्हा पण समाज व घरातुन नाही!

कामातून सेवा निवृत्त व्हा पण समाज व घरातुन नाही!

224

नोकरीतून सेवा निवृत्त झालेल्या अनेकांना पाहिले,लोक म्हणतात आता मस्त आराम करायचा.कसलेच टेन्शन नाही. खरंच असे टेन्शन नसलेल सेवा निवृत्तीनंतर चे जीवन असते काय?. मी यावर अनेकदा लिहले आहे,जे नोकरीत असतात तेव्हा ते स्वतःला कायम साहेब समजत असतात.घरी भी त्यांना नोकरीत आहे म्हणूनच थोडा आदर असतो.पण सामाजात नातलगात फारसा कोणी आदर ठेवत नाहीत, तोंडावर तेवढे गोड बोलतात, बाजूला झाला की खूप हरामाचे कमवून ठेवले,पचून नाही राहिले. सतत काही नां काही बिमारी मागे आहेच.
घरात बसून ही शांतता नाही बायको सतत टोचून बोलते,सकाळी उठा लवकर तुम्हाला काम धंदा नाही आम्हाला खूप कामे आहेत.आम्ही सेवा निवृत्त नाही झालो मरे पर्यत कामे आहेत आम्हाला, कधी सकाळी उठून तो पंखा पुसून घेत जा,ते ट्यूब लाईटच्या बाजूला जाळे दिसत नाही काय?.की आता ही साहेबासारखे ऑर्डर सोडणार आम्हाला?. कधीच घरातल्या कामा कडे लक्ष दिले नाही. त्यामुळेच सेवा निवृत्त माणूस घराबाहेर फिरत असतो.

घरा बाहेर फिरायला गेले की काय रिकामटेकडयावानी फिरत राहता.घरात गप्प बसून राहता येत नाही काय?.घरात बसून राहिले तर आता पहिल्या सारखे दुपारी थोडे अंग टाकुन डोळे मिटायला भेटत नाही.सारखेच चालु राहते हे द्या ते द्या स्वतःच्या हातांनी कधी चहा बनवून नाही पिला या माणसाने नुसता ऑर्डर देत असतो साहेबासारखे, आता तरी चहा घेतला पाहिजे की नाही हाताने बनवून. घरातील कोणतेच काम करण्याची शिकण्याची इच्छा नाही या माणसांची सर्व आयते पाहिजे.हे घरातील दररोजचे संवाद ऐकून काय करावे हे सुचत नाही,असे एक दोन नाही तर खूप सेवानिवृत्त माणसं ज्येष्ठ नागरिक सकाळी संध्याकाळी गार्डनमध्ये बाकड्यावर चर्चा करतांना दिसतात.आणि विशेष ते फक्त दररोज भेटणारा व ओळख झालेला असलेला मित्र म्हणूनच मनमोकळ्या पणे बोलतात.बोलून मनातील दुःख व्यक्त करतात.घरात त्यांचे ऐकून घेणारा कोणी नाही.त्यांची भन भन कोण ऐकील अशी भावना घरातील मंडळींची झाली असते, विशेष जीवनसाथी म्हणून घेणाऱ्या कारभारी,गृहमंत्री,लक्ष्मीची त्यामुळेच अनेक पुरुष ज्येष्ठ नागरिक हैराण झाले आहेत. त्यांना समजून घेणारे साथ देणारे बायका सारखे माहेर नाही.

बायका कशा ही वागल्या तर त्यांचे शंभर टक्के समर्थन करणारे कुटुंब कुटुंबातील माहेरची मंडळी असतेच असते.बायका फारच कंटाळा आला तर किमान माहेरी तरी जाऊ शकतात पण पुरूषांना माहेरही नसतं.आणि मग कंटाळा आला तर ते फक्त पायात चप्पल घालून कोपर्‍यापर्यंत जाऊ शकतात. तिथली टपरी हेच माहेर असल्यासारखं. इतकं होऊनही परत यायला उशीर झाला तर सासुरवाशीणीपेक्षाही बिकट अशी त्यांची अवस्था होते आणि मग ते काहीतरी थातुरमातूर कारणं सांगून वेळ निभावून नेतात.पण जगात खोटं बोलल्यानंतर पकडला गेला नाही असा कुठलाही पुरूष नाही आणि खर बोलल्यावर रागावली नाही अशी कुठलीही बाई नाही.बरेच पुरूष हे आईवडीलांपासून नोकरी करणाच्या निमीत्ताने दूर राहातात आणि त्या निमित्याने आईवडीलांच्या घरी हक्काच्या माहेरपणालाही येतात.पण यातही आईवडील एकटे पडतात म्हणून मनात कायम चोर भावना लपलेली असते.

त्यामुळेच आईवडीलांच्या डोळ्यांत बघून बोलण्याची हिंमत होत नाही.शेवटी प्रश्न हाच पडतो की आई वडीलांपासून वेगळं राहाणं म्हणजेच स्वतःचे घर माहेर की आईवडीलांचं हक्काचं घर म्हणजे माहेर? आणि जर आईवडीलांचं घर म्हणजेच माहेर असेल तर पुरूषांच्या वाट्याला ते माहेरपण का नाही?.ग्रामीण भागात ही असेच चित्र असते ज्या आईवडिलांनी रात्रदिवस मेहनत करून पक्क घर बांधले त्यालाच मुलगा लग्न नंतर झोपडीत राहण्यास भाग पडतो.बापाने मुलाला घरा बाहेर काढले पाहिजे तर मुलगाच बापाला बाहेर काढतो.समाज फक्त बघत राहतो.न्याय निवडा करत नाही.कारण कदाचित,पुरूषांच्या वाट्याला हक्क असतात आणि हक्काची दुसरी बाजू फक्त कर्तव्य असते.कर्तव्याला माहेरपण नसतं हेच खरं असते. माणसांच्या मनात कोणत्या भावना आहे,ते व्यक्तीला पहिल्यावर चेहऱ्यावर दिसतात, डोळ्यात दिसतात.एकेकाळी वटारलेले डोळे पाहून घाबरणारी बायकोच आता डोळे वटारून पाहू लागली की समजून घ्यावे कि,आता आपण शारीरिक,आर्थिक दुष्ट्या काम करण्याच्या शेवटच्या म्हणजेच सेवा निवृत्तीच्या टप्यात आलो आहोत.

कुटुंबातील व्यक्तीचे वय वर्ष साठ झाले की नंतर कुणी आपल्याशी चांगले वागेल ही अपेक्षा ठेवु नका. भाऊबंदकीचे नाते कुटूंबाचे फाळणी बरोबरच संपुष्टात आले असते,नातेवाईक पैसे देणे घेण्याच्या वादातून संपले असते,पत्नीचा ओढा नकळत न टिकणाऱ्या मुलांच्या नात्याकडे वळू लागला,कार्यप्रसंगात नातेवाईक भेटतात, केवळ काय कसे आहात मजेत नां?. फारसी चौकशी होत नाही, तुम्ही मात्र मनात म्हणत असाल आता यांच्याशी मनमोकळी चर्चा करू पण तुम्ही कोणाशी काय बोलता यावर सर्वांचे लक्ष वेधले असते.नाते बिघडली, सबंध तुटलेल्या अवस्थेत असतात. वाट्याला एकटेपण आले असते. आता कुणाचे फोन येत नाहीत, दुखावलेले मन कुणाला फोन कर असेही म्हणत नाही.तरीपण एक नात अजून टिकेल आहे,एक फोन चालु आहे, ते नातं मुलीचं, तितक्यात मुलीचा फोन येतो. ती विचारते तबेत कशी आहे. गेले होते का दवाखान्यात?.औषधं घेतलीत का? जेवण झाल काय? नाना प्रश्न काळजीचे, आस्थेचं विचारणं, जिव्हाळ्याचे हेच एकमेव नात.थोडा पश्चातापही होत असतो, मुलींसाठी काहीतरी करण्यात मी कमी पडलो, त्यांच्यासाठी काहीतरी करायचे राहून गेले, कसे होणार तीचे तिच्या मुलांचे?.लोक मुलगा झाला की, स्वतःला भाग्यवंत समजतात, मला असे वाटते,ज्यांना मुली आहेत ते खरे भाग्यवंत होत.

एरवी दोन तीन मुले जेव्हा वडिलांना कुणाकडे ठेवण्यावरुन भांडत असतात तेव्हा झालेली चूक सुधारण्या पलीकडे गेलेली असते. मुलगी म्हणते काळजी करू नका मी आहे.सेवा निवृत्त झाले म्हणजे काय झाले. तुम्ही कामावरून सेवा निवृत्त झाले समाजातून घरातून नाही.समाजाला समाजाच्या चळवळी ला तुमची गरज आहे.म्हणूनच निवृत्त होण्या अगोदरच समाजाच्या चळवळीत किर्याशील रहा.चळवळ कोणती ही असू शकते,कामगार,कला,क्रिडा,सांस्कृतिक,शैक्षणिक,सामाजिक,धार्मिक आणि राजकीय.साठाव्या वर्षी सेवा निवृत्तीनंतर काय करावे हा प्रत्येकांना प्रश्न पडतो.तर काही लोकांना समस्या वाटते.त्यामुळेच मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या माणूस मनातून खचत जातो.हा लेख लिहिताना मी मुंबई ते नागपूरच्या सेवा निवृत्त अधिकाऱ्यांना सोबत घेऊन अकोला,वाशीम,बुलढाणा या तीन जिल्ह्यात दौरा केला.कामातून सेवा निवृत्ती झाल्या नंतर कामगार चळवळीत मिळणारा मानसन्मान हा पैशात मोजता येत नाही. म्हणूनच कर्मचारी अधिकारी यांनी समाजाच्या चळवळीत किर्याशील राहावे.

✒️लेखक:-सागर रामभाऊ तायडे(भांडुप मुंबई)मो:-9920403859

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here