Home पुणे थोर शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस

थोर शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस

184

थोर शास्त्रज्ञ डॉ ( सर ) जगदीशचंद्र बोस यांचा आज जन्मदिन. जगदीशचंद्र बोस हे भारताचे पहिले जीवशास्त्रज्ञ, भौतिक शास्त्रज्ञ आणि वनस्पती शास्त्रज्ञ होते. जगदीशचंद्र बोस यांनी वनस्पतींमध्येही प्राण्यांप्रमाणे संवेदना असतात हे प्रयोगाद्वारे सिद्ध केले. ऊन पाऊस थंडी, प्रकाश, ध्वनी यामुळे प्राण्यांप्रमाणे वनस्पतींमध्येही संवेदना निर्माण होतात हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी सेस्कोग्राफ नावाचे यंत्र बनवले. या यंत्राने वनस्पतींची संवेदना दहा हजार पटीने मोठी करुन बघता येणे शक्य झाले. सेस्कोग्राफ हे यंत्र वनस्पतिशास्त्रासाठी वरदान ठरले.

जगदीशचंद्र बोस यांचा जन्म ३० नोव्हेंबर १८५८ रोजी बंगालमधील ( आताच्या बांगलादेशमधील ) मैमनसिंग येथे झाला. त्यांचे वडील भगवानसिंग बोस हे सरकारी अधिकारी होते. लहानपणापासून जगदीशचंद्र बोस यांना आजूबाजूचा निसर्ग पाहायचे, त्याचे निरीक्षण करण्याची आवड होती. झाडे, फुले, प्राणी, पक्षी, फुलपाखरे पाहणे हा त्यांचा आवडत छंद होता. जगदीशचंद्र बोस यांचे प्राथमिक शिक्षण गावातल्या शाळेत झाले. कलकत्ता येथील सेंट झेव्हीयर कॉलेजमधून इंटरमिडियट होऊन, कलकत्ता युनिव्हर्सिटीतून भौतिकशास्त्र व डॉक्टरकीचा अभ्यास करून, इंग्लंडच्या ख्रायीस्टचर्च महाविद्यालयातुन भौतिकी, रसायन, वनस्पतीशास्त्र आणि निसर्गशास्त्र यांचा अभ्यास करुन भारतात परतले.

भारतात परतल्यावर कलकत्त्याच्या प्रेसिडेंसी कॉलेजमध्ये भौतिकीच्या प्राध्यापक पदावर रुजू झाले. (१८८५ ) या पदावर रुजू होणारे ते पहिलेच भारतीय असल्यामुळे त्यांना वर्णभेदाला तोंड द्यावे लागले ; पण काही वर्षांनंतर त्यांची योग्यता ओळखल्यावर असामान्य शास्त्रज्ञात त्यांची गणना होऊ लागली. १८८५ ते १८९५ या काळात भौतिकशास्त्र शिकवत असताना त्यांनी विद्युत शक्तीवर संशोधन केले. विद्युत चुंबकीय तरंगाचा शोध लावून त्यांनी बॅटरी बनवली या शोधाची कीर्ती जगभर पसरली. प्रसिद्ध शास्त्रज्ञ पोईनकर आणि जे जे थॉम्पसन यांच्या लेखात या शोधाचा उल्लेख आहे. नेमलाईटच्या मदतीने संदेश पाठवण्यातही त्यांना यश मिळाले.

विद्युतशक्तीवरील संशोधनांनंतर बोस वनस्पती शास्त्राकडे वळले. सचेतन आणि अचेतन वस्तूंमधील साम्य आणि भेद यांचा त्यांनी अभ्यास केला. त्यांनी या विषयावर लिहिलेल्या निबंधांना व दिलेल्या व्याख्यानांना सुरवातीला व्यापक मान्यता मात्र मिळाली नाही. १९०१ मध्ये १९०४ मध्ये त्यांनी लंडनच्या रॉयल सोसायटीला या विषयावर सादर केलेले निबंध स्वीकारण्यात आले नाहीत. याचे अंशतः कारण म्हणजे त्यानी या विषयाचे तत्वज्ञानात्मक विवरण केलेले होते. तथापि वनस्पतींच्या वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी योजलेल्या वनस्पतींच्या अतिसूक्ष्म हालचालींची नोंद करणाऱ्या अतीशय संवेदनशील स्वयंचलित उपकरणाबद्दल आणि या उपकरणाच्या साहाय्याने त्यांनी विविध उद्दीपनांमुळे होणाऱ्या वनस्पतींतील सूक्ष्म बदलांविषयी सातत्याने जमा केलेल्या माहितीबद्दल त्यांची कीर्ती जगभर पसरली. वनस्पतींच्या वाढीचे दहा हजारपट विवर्धन करू शकणारे सेस्कोग्राफ हे स्वयंचलित उपकरण त्यांनी तयार केले होते. या उपकरणाच्या साहाय्याने बोस यांनी वनस्पतींनाही संवेदनग्रहनक्षमता असते असे प्रयोगाद्वारे सिद्ध करुन दाखवले.

वनस्पती अन्न ग्रहण करतात, रात्री लवकर झोपतात, सकाळी लवकर उठतात, मनुष्यप्रामाणे वनस्पतींचाही जन्म, विकास आणि मृत्यू होतो हे जगदीशचंद्र बोस यांनी सिद्ध केले . वनस्पती शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी क्रेस्कोग्राफ, रेझोनंट रेकोर्डर, ऍसिलेटिंग रेकॉर्डर, कंपाउंड लेव्हलर, बॅसलींग ऍपरेट्स इत्यादी उपकरणे त्यांनी तयार केली.१९२० साली त्यांना रॉयल सोसायटीची फेलोशिप मिळाली. सण १९३६ मध्ये त्यांनी कलकत्त्यात बोस इन्स्टिट्यूट रिसर्चची त्यांनी स्थापना केली. संस्थेने मुखपत्रही सुरु केले. जगदीशचंद्र बोस यांनी इरिटेबिलिटी ऑफ प्लँटस, इलेक्ट्रोफिजिओलॉजी ऑफ प्लँटस, ट्रॉपिक मूव्हमेंट अँड ग्रोथ ऑफ प्लँटस, द नर्व्हस मॅकेनिजन ऑफ प्लँटस, प्लॅन्टरिस्पॉन्स १९०६, द फिजिओलॉजी ऑफ फोटोसिंथेसिस, मोटार मॅकेनिजन ऑफ प्लँटस, रिस्पॉन्सेस इन द लिविंग अँड नॉन लिविंग १९०६, लाईफ मूव्हमेंट ऑफ प्लँटस (भाग १ते ४ ) इत्यादी पुस्तके त्यांनी लिहिली. त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले. केम्ब्रिज विद्यापीठाने त्यांना १८९६ मध्ये सन्माननीय डी. एससी. पदवी दिली. द रॉयल सोसायटीने त्यांना १९२० साली सदस्यत्व बहाल केले. ब्रिटिश सरकारने १९१७ साली त्यांना नाईट हा किताब देऊन त्यांचा गौरव केला.

जगदीशचंद्र बोस अतिशय देशाभिमानी शास्त्रज्ञ होते. भारतीयांनी आपल्या महान सांस्कृतिक परंपरेत वैज्ञानिक संशोधन करुन भर घालावी, अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी कलकत्ता विद्यपीठात आणि नंतर बोस रिसर्च इन्स्टिटय़ूटमध्ये संशोधनाला अतिशय प्रोत्साहन दिले. जगदीशचंद्र बोस यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी २३ नोव्हेंबर १९३७ रोजी बंगालमधील ( आता बिहारमधील ) गिरीडी येथे निधन झाले. जगदीशचंद्र बोस म्हणजे संशोधन, ज्ञाननिष्ठा,प्रयोगशीलता, चिकाटी, दातृत्व व देशभक्तीचा अंतिम शब्द. जगदीशचंद्र बोस यांना जन्मदिनी भावपूर्ण अभिवादन!

✒️लेखक:-श्याम बसप्पा ठाणेदार(दौंड जिल्हा,पुणे)मो:-९९२२५४६२९५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here