




आज 28 नोव्हेंबर राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांचा स्मृतीदिन ..स्मृतीदिनानिमित्त महात्मा ज्योतिराव फुले यांना विनम्र अभिवादन!!
राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले शिक्षण मोफत व सक्तीचे आणि सार्वत्रिक असले पाहिजे अशी हंटर कमिशन पुढे परखड भूमिका मांडणारे शिक्षण तज्ञ.. शेतकऱ्याचा आसूड लिहून शेतकऱ्याच्या परिस्थितीचे यथार्थ विश्लेषण करणारे..शेतकऱ्यांविषयी आपली प्रामाणिक भूमिका मांडणारे एक कृषीतज्ञ.ब्राह्मण बहुजनांची पईनी पई भट लुटतात आणि बहुजन कर्जबाजारी होतो हे सांगणारे एक अर्थतज्ञ.. स्त्री पुरुष समानता निर्माण करण्यासाठी तृतीय रत्न नाटक लिहिणारे आधुनिक भारताचे पहिले नाटककार.. शिवाजी महाराजांची समाधी शोधणारे त्याची जयंती सर्वप्रथम साजरी करणारे.. त्यांच्यावर एक हजार ओळींचा पोवाडा रचणारे आद्य शिवचरित्रकार.. अखंडादी रचना करणारे मराठी कवितेचे जनक..पुण्याचे आयुक्त..पुणे कमर्शियल अंड कंत्रॅक्टींग कंपनीचे कार्यकारी संचालक आणि प्रकाशक या विविध भूमिका अत्यंत प्रामाणिक व परखडपणे निभावणारे महामानव..श्रुती स्मृती पोथ्या पुराणं यांची चिरफाड करणारे इतिहास संशोधक..ताराबाई शिंदे,मुक्ता साळवे,फातिमा शेख,तानुबाई बिर्जे या सारख्या निर्भय स्त्रियांना घडवणारे..तसेच तुम्हा आम्हाला मानवतेचा धडा देणारे..
महिलांना सन्मानाने जगण्यास प्रेरित करणारे.. स्त्री शूद्रांना सर्वप्रथम दास्यातून मुक्त करणारे.. स्त्रियांना सर्वप्रथम शिक्षण देऊन त्यांच्या पायातील गुलामगिरीच्या शृंखला तोडणारे..स्त्री ही पुरुषापेक्षा श्रेष्ठ आहे हे सर्वप्रथम पटवून देणारे.. आपल्या पत्नीला आपल्यापेक्षाही अधिक शिकवून भारतातील पहिली शिक्षिका बनण्यास प्रेरित करणारे .. महात्मा ज्योतिराव फुले यांना जगातील सर्वोच्च पुरस्कार दिले तरी त्यांच्या ऋणातून आपण मुक्त होऊ शकणार नाही. जगातील सर्वोच्च पुरस्काराला लाजवील असे त्यांचे कार्य होते.
हिंदू धर्मातील विषमता व अन्यायकारक व्यवस्था उलथवून लावण्यासाठी एकामागोमाग एक क्रांतिकारी ग्रंथलेखन आणि या लेखनातून झालेला विचाराचा स्फ़ोट म्हणजे महात्मा फुले याचे क्रांतिकारी समाजप्रबोधनात्मक,समाजपयोगी, समाजपरिवर्तनकारी विचार होय. खरंतर विचार मांडण्याअगोदर कृती करणे त्यांना पसंत होते.आपल्या प्रत्येक कृतीतून समाजातील प्रतिगामी लोकांच्या प्रश्नांची उत्तरं ते देत होते. समाजासाठी कोणतेही कार्य करत असताना त्यांनी परिणामाची चिंता कधीच केली नाही. आपण केलेल्या कामामुळे आपला सत्कार व्हावा असे त्यांना कधीच वाटले नाही.त्यांच्या कार्याची पावती म्हणजे लोकांनी प्रत्यक्ष त्यांचे क्रांतिकारी विचार स्वीकारले नव्हे कृतीत आणले.समाजातील प्रतिगामी विचारांच्या लोकांना भूकंपाचे प्रचंड हादरे बसावेत या पद्धतीचे त्यांचे विचार होते. लोककल्याणासाठी आयुष्यभर फुले दांपत्यांनी आपली वाणी व लेखणी झिजवली. लोककल्याणासाठी आयुष्यभर चंदनाप्रमाणे झिजले. समाजामध्ये समता बंधुता प्रस्थापित व्हावी हे त्यांचे स्वप्न होते. प्रस्थापित समाजातील विषमता नष्ट करण्यासाठी त्यांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते 1848 साली मुलींसाठी पहिली शाळा काढून पूर्ण केले.
प्रस्थापित प्रतिगामी समाजाच्या विरोधात जाऊन मुलींसाठी पहिली शाळा काढली म्हणून गृहत्याग तसेच मारेकर्यांकडून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला परंतु त्यांनी त्याचे दलित उद्धाराचे मानव कल्याणाचे व्रत निष्ठेने आणि धैर्याने पार पाडले. आधुनिक स्त्रियांनी ही घटना लक्षात ठेवली पाहिजे. 1848 साली स्त्रीयांच्या मुलींच्या उद्धारासाठी एक महामानव निर्भयपणे छातीठोकपणे प्रस्थापित समाजाच्या विरोधात जाऊन दंड थोपटून उभा ठाकला होता. हा निर्भयपणे उभा राहिलेला महामानवाच आपल्यासाठी पूजनीय असावा.या महामानवाला त्यांच्या कार्यात संपूर्ण साथ देणाऱ्या सावित्रीमाई याचं विदेच्या देवता होय.सावित्रीमाई विद्येची देवता मग विद्येची भीक मागण्यासाठी मी काल्पनिक सरस्वतीकडे कशाला जाऊ?? ज्या महामानवामुळे मी सन्मानाने जीवन जगत आहे तो महामानवच माझ्यासाठी पूजनीय असावा मग कशाला मी स्वामी,साधू,बापू,यांना माझा गुरु मानू? या महामानवांनी मला जगण्यासाठीचा मानवतावादी वैज्ञानिक दृष्टिकोन प्रदान केला मग कशाला मी अंधत्वाचं जीवन जगू? असे प्रश्न प्रत्येकाला पडले पाहिजेत तरच आपण जागरूक आहोत.
स्त्रीयांचे उद्धारकर्ते महात्मा ज्योतिराव फुले यांनी विधवा स्त्रियांना न्याय मिळावा यासाठी 1860 साली पुणे येथे बालहत्याप्रतिबंधक गृहाची स्थापना केली. याच बालहत्या प्रतिबंधक गृहातील काशीबाई नामक एका विधवेला झालेले मूल दत्तक घेऊन समाजामध्ये अजून एक आदर्श प्रस्थापित केला.1868 साली आपला पाण्याचा हौद अस्पृश्य लोकांना पाणी भरण्यासाठी मोकळा करून क्रांतीची मशाल पेटवली. या मशालीच्या प्रकाशामध्ये अनेक अस्पृश्यांची घरे उजळून निघाली. जे हजारो वर्षांमधे कधीही घडले नव्हते ते महात्मा ज्योतिराव फुले यांनी घडवून आणले होते. म्हणून त्यांना सुधारक नाही तर क्रांतिकारक म्हणतात.
महात्मा फुले म्हणजे स्त्री व शूद्र यांच्यासाठी जिद्दीने लढणारे एकमेव योद्धा होते. हिंदू धर्मातील वेदाने स्त्रियांना व अस्पृश्यांना हीन लेखले यातील जाचक नियमांना तिलांजली देण्याचे कार्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी केले.हिंदू धर्मातील जाचक रूढी-परंपरांना हद्दपार करण्यासाठी फुले दांपत्यांनी जीवाची बाजी लावली.कमालीची अवहेलना, कुचेष्टा,उपहास सहन केला.यशाच्या तीन पायऱ्या असतात त्या म्हणजे उपहास,संघर्ष, शेवटी यश मिळते.आणि यशस्वी माणसाच्या मागे सर्वच उभे असतात. या सर्व गोष्टी महात्मा फुले यांच्या बाबतीत घडल्या.समाजाचा उद्धार करत असताना त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्याचा कधीच विचार केला नाही. त्या महामानवाला विचाराने आचरणाने आपण कधी स्वीकारणार आहोत?
1869ते 1890 पर्यंत महात्मा ज्योतिराव फुले यांनी विविध विषयावर लिखाण केले .शिवाजी महाराजावरील पोवाडा,सार्वजनिक सत्यधर्म,गुलामगिरी,शेतकऱ्याचा असूड, सत्सार,इसारा,अखंडदी रचना इत्यादी..समाजासाठी प्रबोधनात्मक लिखाण त्यांनी केले. आधी केले मग सांगितले या पद्धतीचे त्यांचे लिखाण आहे.
बहुजनांच्या मागासलेपणाचे कारण म्हणजे अज्ञान होय. हे त्यांनी ओळखले होते म्हणून त्यांनी बहुजनांच्या उध्दारासाठी शिक्षण आवश्यक आहे याची जाणीव होताच शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवण्याचे कार्य सुरू केले. शिक्षणाने शहाणपण येईल , आणि व्यक्ती गुलामगिरी झुगारून देईल परंतु अलीकडे आपण बघतोय की, शिक्षित लोकही गुलामगिरीत जीवन जगत आहेत. ज्ञानाचा तिसरा डोळा असतानाही त्यांना या गुलामगिरीची जाणीव होत नाही हीच मोठी खंत आहे. काल्पनिक गोष्टीच्या मागे लागून वास्तविक गोष्टींना नकार देण्याचे प्रमाण वाढत आहे. महात्मा फुलेंनी बहुजनांना शिक्षण देण्याचा उद्देश म्हणजे बहुजनांना आपल्या गुलामगिरीची जाणीव व्हावी शिक्षण मिळताच बुद्धीची पटलं खुली व्हावी, गुलामगिरीच्या बेड्या गळून पडाव्यात हे शिक्षणाचे साध्य होय. शिक्षणातून माणूस घडावा. समाजाची राष्ट्राची प्रगती व्हावी. समाजातील कालबाह्य झालेल्या रूढी परंपरा नष्ट व्हाव्यात. परंतु आपण हा वैज्ञानिक मानवतावादी दृष्टीकोण कितपत स्वीकारला याचं आत्मपरीक्षण करण्याची गरज निर्माण झालेली आहे.
महात्मा ज्योतिराव फुले यांनी अनेक कालबाह्य झालेल्या परंपरा नाकारल्या.त्यासाठी 1860 साली विधवा पुनर्विवाह घडवून आणला.आजच्या आधुनिक युगातही अशा काही जाती आहेत की, आजही ते लोक आपल्या विधवा मुलींच्या पुनर्विवाहास नकार देतात. आजही आमच्या समाजातील विधवा महिला आत्मविश्वासाने जीवन जगू शकत नाही. कारण समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा नकारात्मक दृष्टिकोन त्याला कारणीभूत आहे. आजही आमच्या स्त्रिया मुली स्वतःला सुरक्षित समजू शकत नाही.त्याचं कारण एकच आहे ते म्हणजे स्त्री-पुरुष विषमता!ही विषमता आजही येथे नांदत आहे. आजही आमचा समाज उच्चशिक्षित महिलांकडे मानवतावादी दृष्टिकोनातुन पहात नाही.. पाहतो तर फक्त ती एक स्त्री आहे या दृष्टिकोनातून.. आजही आमच्या समाजातील स्त्रियांच्या हत्या आत्महत्या थांबत नाहीत.. आजही आमच्या राजपत्रित उच्चपदस्थ स्त्री अधिकाऱ्यांवर अन्याय अत्याचार होत आहेत. मग ती मनीषा वाल्मीकी असेल किंवा दीपाली चव्हाण!! कोणत्याही पुरुषानें स्त्रीयांच्या मानवी हक्काच्या आड येऊ नये. हा महात्मा फुलेंचा स्त्रीवादी मानवतावादी दृष्टिकोन सर्व पुरुषाने स्वीकारला तर अशा घटना घडणार नाहीत.
महात्मा ज्योतिराव फुले यांनी कालबाह्य झालेल्या प्रत्येक परंपरेला पर्यायी व्यवस्था निर्माण करून देण्यासाठी
24सप्टेंबर 1873साली सत्यशोधक समाजाची स्थापना केली. आचरणाचे तेहेतीस नियम त्यांनी सांगितले हे तेहेतीस नियम म्हणजे तेहतीस कोटी देवांना नाकारणारे मानवतावादी आचरणाचे नियम होय.1875ते 1877 या काळामध्ये महाराष्ट्रमध्ये दुष्काळ पडला होता. दुष्काळाच्या काळामध्ये महात्मा फुले यांनी अनेक लोकोपयोगी कार्य केली. दुष्काळात त्यांनी 52अन्नछत्र सत्यशोधक समाजामार्फत चालवली. सावित्रीबाई फुलेंनी त्यांना संपूर्ण साथ दिली. आज covid-19 च्या काळात आपण बघितलं की, लोकांचे काय हाल झाले .आपल्या आप्त जणांचे मृतदेह स्वीकारण्यास कोणी तयार झाले नाही.तेथे सावित्रीबाई फुले यांनी प्लेग च्या काळात केलेले कार्य म्हणजे उल्लेखनीय! महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांचा जन्मच मुळी दुसऱ्यांच्या उद्धारासाठी झाला होता असे म्हणणे संयुक्तिक होईल. कारण रात्रंदिवस फुले दांपत्य समाज उद्धाराचे कार्य करत होते. महात्मा फुले म्हणतात,
सार्वभौम सत्य स्वतःआचरावे
सूखे वागवावे पंगु लोका!
अशा वर्तन आणि सर्व सुख द्याल
स्वतः सुखी व्हाल ज्योती म्हणे!!
2 मार्च 1888साली ड्युक ऑफ कॅनॉट चा सत्कार समारंभ झाला. या सत्कार समारंभाला शेतकऱ्याच्या वेशात उपस्थित राहून शेतकऱ्याचे प्रतिनिधित्व करणारे महात्मा फुले हेच सांगत होते की, भारतीय शेतकरी कसा आहे.त्यांची अवस्था कशी दयनीय आहे याची वास्तविक माहिती जगाला कळावी आणि त्यातून शेतकऱ्यांच्या हिताचे कार्य घडावे हाच त्यांचा उद्देश होता. आज आपण पाहतोय की आपल्या हक्क,अधिकारासाठी शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागले .कित्येक शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला परंतु मायबाप सरकारला काय त्याचे?? शेतकरी शेतामध्ये रक्ताचं पाणी करुन पीक काढतात परंतु त्याचा भाव ठरवण्याचे स्वातंत्र्य त्यांना नाही. एवढंच नाही तर ज्याला बळीराजा म्हणतात जगाचा पोशिंदा म्हणतात तोच आपल्या देशामध्ये उपाशी राहतोय? कर्जमाफी दिल्यामुळे कोणतेही प्रश्न सुटत नाहीत. शेतकऱ्यांना कायमस्वरूपी सिंचनाच्या सुविधा देऊन बघा मग शेतकऱ्याला तुमच्या कर्जमाफीची गरज उरणार नाही. महात्मा फुले हे द्रष्टे सुधारक क्रांतिकारक होते. मायबाप सरकारने महात्मा फुले यांचे विचार स्वीकारावे त्याचे आचरण करावे तर खरी क्रांती होईल.
जन्म मृत्यू पाप-पुण्य स्वर्ग-नरक या त्यांच्या संकल्पना बुद्धिजीवी लोकांना आकर्षित करतात म्हणूनच महात्मा फुले यांचे क्रांतिकारी विचार आजही विविध सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक चळवळीसाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक आहेत. महात्मा फुले यांचा मानवतावादी वैज्ञानिक दृष्टिकोन प्रगल्भ होता. माणसाला माणूस म्हणून सन्मानाने जगू द्या.हा त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू होता. धर्मविषयक त्यांचे विचार अत्यंत उदार होते. ते म्हणतात ज्याला जो धर्म स्वीकारायचा तो त्यांनी स्वीकारावा परंतु आपले आचरण नेहमी स्वच्छ ठेवावे. विचार व कृती या दोन गोष्टीत भेद करणाऱ्या लोकांसोबत त्यांनी कधीच काम केले नाही. विधवा पुनर्विवाहासाठी कार्य करत असताना रानडे यांनी स्वतःच्या बहिणीचा पुनर्विवाह करण्यास नकार दिला तेव्हा महात्मा फुले यांनी रानडेना आपल्या घरातून हाकलून दिले. समाजासाठी कार्य करत असताना त्यांनी तत्वाशी तडजोड कधी केली नाही. आपलं काम करून घेण्यासाठी कुणाची हाजीहाजी करणे त्यांना पसंत नव्हते.आणि मला असे वाटते की,महात्मा फुले यांचे अनुयायी ही त्यांच्या सारखेच तत्वनिष्ठ असावेत.
समाजामध्ये स्वातंत्र्य समता बंधुता व न्याय प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी लिंग भेदभाव, वर्गरचना जातीव्यवस्था या शोषणकारी व्यवस्थेवर कडाडून हल्ला केला. तसेच स्त्रीपुरुष समानता , जातिनिर्मूलन, धर्मविषयक उदार दृष्टिकोन , आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन, शिक्षणविषयक त्यांची भूमिका याद्वारे नैतिक परिवर्तनास चालना दिली. महात्मा फुले हेच आधुनिक भारताचे प्रमुख शिल्पकार होय. स्त्रियांना सन्मानाने स्वाभीमानाने आणि प्रतिष्ठेने जगण्यास प्रेरित करणारे.. स्त्रियांच्या ओबड-धोबड जीवनाला आकार देणारे.. स्त्रियांच्या पायातील गुलामगिरीच्या शृंखला तोडणारे.. स्त्रियांना आत्मनिर्भर बनवणारे.. मानवतेचा सर्वोच्च बिंदू .. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम..
जय ज्योती जय क्रांती!!
✒️श्रीम.मनीषा अंतरकर(जाधव)मो:-7822828708
[email protected] com




