



🔹 तब्बल २८ वर्षा नंतर भेटले सर्व माजी विद्यार्थी….
✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील)
धरणगांव(दि.23नोव्हेंबर):- धरणगाव येथील सुवर्णमहोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेत सन १९९२ – ९३ बॅच चा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न झाला.
या स्नेहमेळाव्याचे प्रास्ताविक स्वाती पाटील यांनी केले. या स्नेहमेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.पी.आर सोनवणे मॅम होत्या. प्रमुख अतिथी म्हणुन शाळेचे माजी शिक्षक बी.ए. पाटील, जे.ए. पाटील, आर.बी.पाटील, जी. टी.महाजन, माजी मुख्या.आर.डी.महाजन,एम. के.महाजन, एस.आर. महाजन, जे.ए.अहिरे, अनिल माळी, क्रिडा शिक्षक व्ही.पी. महाले, व्ही.टी.माळी, राजु ठाकुर उपस्थित होते.
सर्वप्रथम कार्यक्रमाच्या अध्यक्षा व सर्व प्रमुख अतिथी मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व विद्येची खरी देवता सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
शाळेतील आठवणींना उजाळा देत महात्मा फुले हायस्कूलचे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. या आगोदर ४ स्नेहमेळावे शाळेत उत्साहात संपन्न झालेले आहेत. हा पाचवा स्नेहमेळाव्याचे आयोजन सन १९९२-१९९३ च्या वर्षांतील शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी सुंदर आयोजन करून सहभागी झाले होते.
स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने परत एकदा एकत्र आलेले सर्व माजी विद्यार्थी आठवणीत हरवून गेले होते. ‘प्रत्येकजण आपली शाळा कशी आहे, हे डोळ्यांमध्ये साठवून घेत होता. शाळेचे बदललेले रूप, वर्ग मित्र भेटल्याचा आनंद सर्वांच्याच चेहऱ्यावर दिसत होता.
यावेळी धरणगांव शहरातील माजी विद्यार्थी डॉ.देवकीनंदन वाघ, प्रा.प्रशांत पाटील, अभिजित पाटील, विजय महाजन, सुरज पाटील, एकनाथ महाजन, पंकज महाजन, प्रशांत निकम, सुधाकर महाजन, मनीषा माळी, मंगला महाजन, सुशीला महाजन, नाना मराठे, अजय महाजन, दिलीप पाटील, भिकन चौधरी, कैलास धुरेकर देविदास पाटील यांच्यासह सर्व माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित सर्व शिक्षकांचा कुळवाडी भूषण – बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवरायांची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला.
या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने सकाळपासून संध्याकाळपर्यंत जुन्या आठवणींना उजाळा व ओळख परेड, तसेच स्नेहभोजन व शाळेविषयी जुन्या आठवणींना उजाळा देत प्रत्येकाने आपले मनोगत व्यक्त केले . उपस्थित मान्यवरांनी या मेळाव्याच्यानिमित्ताने आपली मनोगते व्यक्त केली . यावेळी माजी शिक्षक जे.ए. पाटील म्हणाले आजच्या युगात तरुण पिढी बिघडली असे म्हटले जाते पण आमच्या महात्मा फुले हायस्कूलचे सन ९२ -९३ च्या सालातील आमचे विद्यार्थी बिघडलेले नाहीत तर चांगल्या संस्कारांची शिदोरी घेऊन त्यांची वाटचाल यशस्वीपणे चालू आहे. यावेळी त्यांनी काही जुन्या आठवणींना उजाळा देत विद्यार्थाच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले. माजी मुख्या.आर. डी.महाजन, एम.के.महाजन, एस.आर.महाजन यांनी या स्नेहमेळाव्याचे कौतुक केले व माजी विद्यार्थ्यांच्या आठवणींना उजाळा दिला. आपल्या शाळेला 50 वर्षे पूर्ण झाले याचा मनस्वी आनंद आहे असे प्रतिपादन केले.
या वेळी बोलताना माजी विद्यार्थी विजय महाजन म्हणाले की, या मेळाव्याच्या आयोजनामुळे एक नवीन दिशा मिळणार आहे. गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थी संघटनेची स्थापना करून त्या मार्फत मदत करावी.माजी विद्यार्थी अभिजित पाटील म्हणाले की, ‘माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येवून धरणगाव तालुक्याच्या शिक्षण क्षेत्राला चांगली दिशा देण्याचे काम करता येईल. मेळाव्याचे आयोजन करण्यामागील हेतु स्पष्ट केला.या स्नेहमेळाव्याचे सुत्रसंचलन एलसीबी पोलीस कॉन्स्टेबल सुरज पाटील यांनी तर अभार प्रशांत निकम यांनी मानले. माजी विद्यार्थी स्नेहमेळावा ७० हुन अधिक विद्यार्थ्यांच्या उदंड प्रतिसादात आणि १५ + शिक्षकवृंदाच्या उपस्थितीत जोरदार संपन्न झाला.


