Home महाराष्ट्र आकाशाहून उंच..!

आकाशाहून उंच..!

264

नमस्कार, वाचक मित्रहो! माझ्या व्यक्तीविशेष लेख मध्ये सर्वांचे स्वागत! दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या असतील, व तुमची दैनंदिन काम, व्यवसाय, नोकरी निमित्त नेहमीचीच भटकंती,धावपळ,दगदग एव्हाना सुरू झाली असेल. धावपळ म्हटले की कामाच्या ठिकाणी जायला आपल्यासोबत दुसरा एक साथी पळापळ करतो; तो म्हणजे तुमची दुचाकी, मोटारसायकल!माझ्याकडेडी दुचाकी मोटारसायकल आहे. तिचे नाव आहे, ‘ग्लॅमर!’. मोठेपणा म्हणून नाही; माझ्याकडे ती आहे; म्हणून सांगत आहे. आणि कसला आला मोठेपणा! इथे फॉरच्यूनर, रेंज रोव्हर फिरवणाऱ्याला मोठेपणा नाही की गर्व, तिथे आमच्या दुचाकीचे काय घेऊन बसलात. विषय यासाठी काढला, की माझी गाडी नावालाच ग्लॅमर आहे, ती घेतली तशी ग्लॅमर(आकर्षक) तर सोडून द्या सगळी मरमरच आहे. कर्जावर गाडी उचलणाऱ्यांनी जेवढे कर्ज भरले नसेल तेवढा मेंटेनन्स (रखरखाव) खर्च मला या गाडीला नगदी घेऊन भरावा लागला. आजही भरतच आहे. असू द्या! मी कुठे माझ्या गाडीचे पुराण सांगत बसलो. जशी गाडीने विषयाची सुरवात झाली, तसा लेखही तिथूनच सुरू होतो.

झाले असे, आज मी माझ्या कामाच्या ठिकाणी जात असताना, रस्त्यावरून एक व्यक्ती मला काहीतरी इशारा करत होता. आजकाल बरेचजण हात दाखवून सांगतात; पहा-गाडीचा लाईट चालू आहे; इंडिकेटर मिचमीच करत आहे; स्टँड उघडे आहे; वैगरे, वैगरे! पण हा इशारा त्यातला नव्हताच! जरा विचित्रच होता. अंगात करंट उतरल्यासारखा! मी म्हटले असे काय चालू आहे आपल्या दुचाकीचे? जे या व्यक्तीला कळले, पण गाडी वापरून मला कळेना. जास्त विचार, निरीक्षण करून पाहिले तर माझ्या गाडीचे समोरचे चाक अंगात देवी आल्यासारखे नागीणसारखे हालत होते. आता याची दुरुस्ती करत बसायला मी काही मेकॅनिक नव्हतो, अन् असाही पाहण्यापलीकडे काही करू शकलो नसतो.मग, माझा दौरा साधारणतः 4:30 च्या सुमारास माझा नेहमीचा दुचाकीचा डॉक्टर(मेकॅनिक) अजगर पठाण मौजे-माळेगाव ता.कळमनुरी जि.हिंगोलीकडे वळाला. कारण असे प्रॉब्लेम नीट करायला अजगर भाईच बादशाह होता. पहिले तर अजगर भाई चाकाकडे दोन मिनिटे पहातच राहिले. मी मनाशीच म्हणालो, या गाडीने मला तर आधीच वैतागून सोडले, आता असा कोणता रोग काढला जो अजगरला पण कळत नाही. खूप पहाणी केल्यानन्तर अजगरने चाकामध्ये डग आल्याबाबचे निदान केले. रोग कळला; पण डॉक्टर आता बदलायचा होता. अजगरनेच पुढच्या डॉक्टरची चिट्ठी लिहून दिली तसा मी त्या डॉक्टरकडे (मेकॅनिक) वळलो.
अजगर भाईने माणूस सुचवला म्हणजे तो उत्कृष्टच असेल, अशी भावना माझी एव्हाना झाली होतीच. त्या व्यक्तीचे नाव होते.

‘आकाश!'(मौजे-कळमनुरी). फक्त नावच सांगतो. आडनाव सांगितले की जात निघते आणि जात निघाली की सगळेच बिघडते. तसे मला आकाशचे आडनाव माहिती नाही, आणि मी विचारलेही नाही.असो! साधारणपणे संध्याकाळच्या 5 वाजता मी ‘आकाशच्या’ छोटेखानी गॅरेजसमोर उभा होतो. आकाशला मी येण्याची कल्पना अजगरने आधीच दिलेली होती. परंतु, काही कामानिमित्त आकाश बाहेर गेलेला असल्यामुळे तो तिथे उपस्थित नव्हता. त्याचा छोटा भाऊ मला भेटला. त्याने सांगितले की आकाश चहा प्यायला गेला आहे; इतक्यात तो येईलच. भाऊ येईपर्यंत त्या मुलाने जे जमेल ते करून पाहिले. पण, त्याला तितके काही न जमल्यामुळे भावाचीच वाट पहावी असे त्याने मनाशीच ठरवले तितक्यात आकाशचे आगमन झाले. त्याला पहाताच क्षणी मला वाटले, की हा काय करणार माझी दुचाकी व्यवस्थित! म्हणून माझी थोडी निराशा झाली. म्हणजे मला त्याच्यात तसे कसब असतील असे अजिबात वाटले नाही. आकाश आला, त्याने पाहिले, त्याने ओळखले.असेच काही गाण्यातल्या बोलासारखे झाले; आणि पाहून तो काय म्हटला असेल? तो म्हणाला तुमच्या गाडीच्या चाकात(रिंगमध्ये) कुठलाही डग नाही. मी तर परेशानच झालो. अजगर भाईने याच्याकडे विश्वासाने पाठवले आणि हा शस्त्र टाकून बिनधास्त झाला. परंतु, आकाशने तांत्रिक बाबी जेव्हा मला व्यवस्थित समजावल्या तेव्हा कळले की चाकात डग नाही.

तरीसुद्धा म्हटले की मग प्रॉब्लम कुठे आहे? ग्लॅमर गाडीला पुढे डिस्क ब्रेक असतो, तिथली टेकवायची पट्टी जरा वाकली होती. त्या पट्टीवर हातोडीचे दोन ठोके देऊन आकाशने तो प्रॉब्लम नीट केला; आणि आता बिनधास्त रहा! असे सांगितले.आपल्याला असे वाटत असेल, की यात व्यक्तिविशेष लेख लिहावे असे काय आहे? व्यक्तिविशेष व्ही.आय.पी.च असतो असे नाही. सामान्य माणसातपण विशेष गुण असतात, जे माझ्यासारख्या पामराला शिकण्याचे बाळकडू फुकटात देऊन जातात.आकाशने पहाताच क्षणी गाडीत काही प्रॉब्लम नाही म्हटल्यावर मला त्याच्या कामाविषयी, त्याच्या कौशल्यावर शंका निर्माण झाली होती. ही गोष्ट थोडया वेळापुरती बाजूला ठेवा. या कामात त्याला सहज 100 ते 150 रुपये मिळत होते. मला तो तसा मूर्ख बनवूनही पैसे काढू शकला असता. मी तर आधीच मानसिकता केली होती की चाकात डग आहे. असेही मला काय कळणार होते. पण, त्याने तसे न करता, माझी फसवणूक न करता, इमानदारीचा मार्ग पत्करला; आणि माझ्यातला निरीक्षक या गोष्टीला हेरत नसेल तर माझी लेखणी लवकरच कोरडी होईल की!

असेही आपण बऱ्याच गॅरेज असो, किंवा आपल्या कुठल्याही कामाची दुरुस्ती असो,मग तुमचे शरीरच का असेना अवाच्या सव्वा रुपये खर्चून येतो. कुठे गरज असते, तर कुठे गरज आहे असे दाखवून आपली लूट केली जाते. माणसात जर एकच चांगला गुण असेल, तर ते कमीपणाचे अजिबात लक्षण नाही. कारण जो एक गुण आहे तो सर्वश्रेष्ठ आहे; आणि हेच महत्वाचे आहे. ‘इमानदारी’, ‘खरेपणा’, ‘प्रामाणिकपणा’ हा तो गुण! इमानदारी असावी असे लोक तर नेहमीच म्हणतात. पण, ते दुसऱ्यात! स्वतःची इमानदारी कधी तपासून पहातच नाहीत. मी इमानदार आहे; असे मी म्हणू शकतो.पण, खरेपणा सांगायला व तो सिद्ध करायला निदान एक दिवस विचार अन् तपासणी करतो म्हटले तर जन्म पुरणार नाही; आणि तुमचा खरेपणा लोकांच्या नजरेत दिसत, भरत असेल तर तो खरेपणा! बाकी सगळा बुजगावण्यांचा डोंगर!आकाशचे खरेखुरे रूप पाहिले तेव्हा मी याच्यावरती कविता लिहू; असे नक्की केले. काही वेळापुरते तर मला वाटू लागले, माझ्या गाडीत काहीतरी प्रॉब्लम निघावा, जेणेकरून मी स्वाभिमानी आकाशला त्याचा मोबदला देऊ शकेल.पण,आकाशवरती लेख लिहायची तीव्र भावना जाता जाताच्या त्याच्या नम्र वागण्यामुळे झाली. आकाशने दोन ठोके मारून रिंग व्यवस्थित केली असली तरी त्यासाठी त्याला निदान विचार करून दहा मिनिटे द्यावी लागली.

माणसाच्या कामाला दहा मिनिटे लागो की एक मिनिट, मी त्या कामाचा मोल करणाऱ्यापैकी आहे. सलूनमध्ये केस कापायला डोक्यावर चार केस असले तरी न्हावी कमी पैसे घेत नाही; आणि घेऊ पण नाही. वेळ गेला हे महत्वाचे आहे; किती केस कापले हे नाही! म्हणून आकाशचा कामात वेळ गेला, डोकं खर्च झाले; त्याचा अनुभव व कौशल्य कामी आले. मोल त्या गोष्टीचे होते. मोल म्हटले की किंमत आली; म्हणून मी आकाशला मजुरी विचारली तर त्याने ”राहू द्या!” म्हटले. म्हणजे काहीच नाही. मी म्हटले, “असे नाही; काहीतरी घ्यावेच लागेल!” तेव्हा त्याने केवळ 20 रुपये स्वीकारले, तेही मी दिले तितकेच! ती रक्कम त्याच्या कौशल्यासाठी तुटपुंजी होती; आणि अधिकची देऊन मला त्याचा आत्मसन्मान दुखवायचा नव्हता. तसेच त्याने दिलेल्या शिकवणीसाठी तर ती नव्हतीच, कारण ती अमूल्य होती.आकाशचा हा स्थायीभाव मला प्रचंड आवडला; आणि तिथेच त्याच्यावरती कविता रद्द होऊन लेख लिहू, हे नक्की झाले. कारण, लेखामध्ये चांगले समजावून सांगता येते, आणि कळते.आकाश म्हणजे 26-27 वर्षाचा मुलगा आहे. गॅरेज म्हटले तरी पन्नास हजारच्या वर भांडवल नसावे.

निव्वळ मेहनत करून पोट भरणे हा त्याचा उदरनिर्वाह! काल-परवा पोटाचा सामान्य प्रॉब्लम आला म्हणून कुठल्याही टेस्टमध्ये काहीही न निघता मला 3000 रुपये खर्च करावे लागले. (तसा काहीतरी प्रॉब्लम असेल म्हणा! फक्त तो सापडला नसावा, इतकेच!) तसा तो त्या टेस्ट व मेडिकलचा खर्च होता. ज्यात मेडिकल 1000 रुपयांचे झाले. इथे कोणी असेल किंवा कुठेही एखादा व्यक्ती काम केले म्हणून वेळ देत असेल तर त्याचा मोबदला आकारतोच! काम नाही झाले; म्हणून घेत नाही! असे कधी होते का? किंवा थोडाच वेळ लागला नाहीतर थोडेच काम झाले म्हणून तो अर्धी रक्कम परत करतो का? तसे होत नाही. तो पूर्णच आकारतो आणि आपण ती देतो. तिथे या 27 वर्षाच्या पोरामध्ये खरेपणा व इमानदारी कशी व कोणी भरली असेल? मला विचार करायला प्रवृत्त करून गेले. आई-वडिलांची शिकवण असेल तर धन्य ते मायबाप आणि स्वतःच अनुभवातून शिकला असेल तर तुला पाहून आम्हीही शिकावे, असा आकाश- तू आमचा गुरू!मी असे म्हणत नाही, की आकाशचं या भूतलावावर एकटाच खराखुरा प्रामाणिक व्यक्ती आहे. असे असतील, पण मोजकेच! ते मला सापडतील, तेव्हा त्यांना आपल्यासमोर नक्कीच सादर करेल.आकाश तुझ्यावर प्रत्येकजण लिहणार नाही.पण तुझा स्वभाव प्रत्येकाला भुरळ घातल्याशिवाय राहणार नाही. लिहिलेले एकवेळ पुसल्या जाईल, पण मनात राहिलं ते कायमचेच!

आय.ए.एस. होऊन हुशार म्हणवले गेलेले (सगळेच म्हणत नाही मी) लाच स्वीकारताना पकडले जातात तेव्हा इमानदारीचा अडाणीपणा स्पष्ट झळकतो. जिथे इमानदारी पाहण्याचे ना यंत्र आहे की तंत्र तिथे आकाशसारखे माणसे त्यांच्या वागण्याने खऱ्या आकाशालाही ठेंगणे करतात, आणि तो किती उंच आहे हे त्याच्या वागण्यातून दाखवून आकाशाला खऱ्या अर्थाने लाजवतात.आणि महत्वाचे, आकाशची व माझी ही प्रथमच भेट होती. त्यापूर्वी मी त्याला ओळखत नव्हतो, आणि तो मला!

( नन्तर वडिलांशी संपर्क साधल्यावर कळले, की गाडीत हा प्रॉब्लम गेल्या एक महिन्यापासून आहे. स्थानिक बऱ्याच मॅकेनिकला दाखवले; पण त्यांना काही जमले नाही. हं! नाहक खर्च तेवढा झाला.)(आकाश संपर्क क्र. 7972824446/7387737443

छोटा तू वयाने
तुझ्या शरीराने
बुद्धी तुझी इतकी महान
संतही म्हणतील अस्मानातून
आम्ही ठेवून गेलो
अंश आमचा छान…!!

✒️लेखक:-अमोल चंद्रशेखर भारती(लेखक/कवी/व्याख्याते,नांदेड)मो:-8806721206

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here