




🔹ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पा अंतर्गत कोळसा वनपरिक्षेत्रातील विश्रामगृह दुरुस्तीच्या नावावर लाखोंचा भ्रष्टाचार
🔸ऑल इंडिया पॅन्थर सेनेकडून कारवाई करण्याची मागणी
✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)
जिवती(दि.7ऑक्टोबर):-ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पा अंतर्गत येणाऱ्या कोळसा वनपरिक्षेत्रातील वन विश्रामगृह दुरुस्ती करण्याच्या नावाखाली कोणतेही अंदाजपत्रक वा ई-टेन्डरिंग न मागवताच शासनाचा लाखो रुपयांचा निधी खर्च केला असून मोठी अफरातफर झाल्याचे माहिती अधिकारातून स्पष्ट उघड झाले आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे सहा. वनसंरक्षक कुलकर्णी यांनी वन विश्रामगृहाची कथीत दुरुस्तीच्या नावाखाली तेथील वनपरिक्षेत्र अधिकारी व वनपाल यांना विश्वासात न घेता वा शासनाच्या कोणत्याही प्रोसेस पार न पाडता आपल्या मनमर्जीने काम करुन शासनाचा लाखो रुपयांचा निधी हडप केला आहे. यात कोणतीही मोजमाप पुस्तीका व व्हावचर स्वतः कुलकर्णी यांनी तयार केले आहेत.
त्यात वनपाल व वनपरिक्षेत्र अधिकारी यांना विचारात घेतले नाही व तशी त्यांची कोणतीही स्वाक्षरी नाही. या कामाची तांत्रीक व प्रशासकीय मंजुरी सुद्धा घेण्यात आलेल नाही. ईमारत पुर्ण झाल्याचा दाखला सुद्धा घेण्यात आलेला नाही. अश्या विविध बाबी पुर्ण न करता सहा. वनसंरक्षक अतुल कुलकर्णी यांनी स्वतः ठेकेदार बनत स्वतःच्या पदाचा गैरवापर करुन शासनाच्या लाखो रुपयांचा निधी हडप केला आहे.
या संपुर्ण भ्रष्ट कारभाराची विभागीय चौकशी करून भ्रष्ट कारभार करणाऱ्या प्रशासनाचा निधी हडप करणाऱ्या सहा. वनसंरक्षक कुलकर्णी यांचेवर फौजदारी कार्यवाही करुन त्यांना तात्काळ निलंबीत करण्यात यावे अशी मागणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने पत्र परिषदेतून केली आहे. वरिल प्रकाराची योग्य चौकशी न केल्यास व दोषीवर कारवाई न केल्यास ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने मुख्य वनसंरक्षक यांच्या कार्यालयासमोर उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा पँथर सेनेने दिला आहे. पत्र परिषदेला उपस्थित ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार, उपाध्यक्ष त्यागीभाई देठेकर, जिल्हा युवाध्यक्ष अजय झलके, सुरेश नारनवरे, भय्याची मानकर, संतोष डांगे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.




