Home महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांना सरसकट मदत करेल का?

शासन शेतकऱ्यांना सरसकट मदत करेल का?

384

दुष्काळ म्हणजे पाण्याची व त्यायोगे अन्नस्रोतांची अनुपलब्धता किंवा तीव्र टंचाई असलेला, अनेक महिन्यांचा वा वर्षांचा दीर्घ कालखंड होय. दुष्काळ येण्यास वातावरणातील आकस्मिक बदल, वृक्षतोड, ज्वालामुखींचे उद्रेक किंवा वणवे इत्यादी कारकांनी उद्भवलेले पर्यावरणीय जलचक्रातील दोष असू शकतात. यंदाच्या सन २०२१ सालाला महाराष्ट्राच्या अगदी पुर्वेला स्थित गडचिरोली जिल्हा आजही पाण्याविना वखवखलेला आहे. तर उर्वरीत भागांत अतिवृष्टीने मानवमात्रांच्या नाकी दम कोंडले आहे. संपूर्ण राज्यभरातील बिचारा शेतकरी बांधव पुरता महासंकटात गटांगळ्या खात आहे. अन्नदात्याची केविलवाणी हाक शासनास ऐकवावी, या हेतुने श्री कृष्णकुमार निकोडे यांनी हा लेखप्रपंच हाती घेतला आहे. – संपादक.

दुष्काळात अन्नपाण्याच्या अभावी माणसांसह बहुसंख्य सजीवांना प्राणसंकटास तोंड द्यावे लागते. जेथे दुष्काळ पडतो, त्या ठिकाणची उत्पादकता, वसणूक पुन्हा सावरणे खूप कठिण असते. तेथे जीवन पूर्ववत होण्यास अनेक वर्षे लागू शकतात. इ.स.२०१६मध्ये लातूर महा नगरपालिका असलेल्या शहरालासुद्धा आगगाडीने पाणी आणावे लागले होते. जलयुक्त शिवार आणि विकेंद्रित जलसंधारण योजना यांचा त्यात समावेश आहे. प्रधानमंत्री कृषिसिंचन योजनेखाली दहा लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणली जाईल, असे सरकारने तेव्हाच सांगितले होते. राज्य सरकारच्या या पुढाकाराला जनतेने खुप साथ दिलेली असून मोठ्या प्रमाणावर कामे होत आहेत. राज्य सरकारचा ‘जलयुक्त शिवार अभियान’ हा कार्यक्रम गावे टँकरमुक्त करण्यासाठी खूपच लाभदायी ठरला आहे. आज दुष्काळावर सरकार प्रयत्न करत आहे, असे त्यांना वाटते. परंतु ते लोकांपर्यंत किती पोहचले? याची पडताळणी होताना दिसत नाही.

दुष्काळाचे दोन प्रकार- कोरडा दुष्काळ आणि ओला दुष्काळ असे सांगितले जातात. कोरडा दुष्काळ अनेक वर्षापर्यंत लांबतो. सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आणि सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल तर कोरडा दुष्काळ पडतो. शेतीच्या भागांमध्ये पावसाची कमतरता आणि गरजेपेक्षा जास्त तापमानामुळे पिके करपतात. यंदा विदर्भातील गडचिरोली जिल्हा पावसाळा निघून गेला तरी पाण्याविना तहानलेला आहे. यंदा नदी, नाले, ओढे आदींना पूर कसा म्हणून आला नाही. धान रोवणीच्या वेळीही पाऊस पाहिजे तसा न पडल्यामुळे शेतकऱ्यांनी टेकडी शेते लावणी न करताच पडित ठेवली. कशीबशी लावली तीही पुढे पावसाअभावी वाळून झुरून करपली व मेली. उष्णतेमुळे उकाडा तर सतत होत आला आहे. आता पुढचे भविष्यही गडद काळोखाचे दिसू लागला आहे. कारण पाण्याअभावी झाडे कोरडी पडतात. जंगलात वणवे पेटतात. हे वणवे दूरपर्यंत पसरत जातात. काही वेळा तर जमीन पार ओसाड होऊन जाते. अशा जमिनीवर पुन्हा पीक उगवणे कठीण असते. नद्या, तलाव, विहिरी आदी साधने खट्ट कोरडे पडतात. प्राण्यांना पिण्यासाठी सुद्धा पाणी उपलब्ध होत नाही. या दुष्काळात जमीन पाण्याअभावी भेगाळलेली असते. धरणांचे मोठे प्रकल्प उभारले जातात. त्यावर अधारीत सिंचन करून पाण्याचा प्रश्न सोडवला जातो. परंतु या प्रकल्पांना अनेक मर्यादा असतात.

तसेच विस्थापन नियोजन करणे अवघड असते. म्हणून आधुनिक काळात विकेंद्रित व क्षेत्रीय जलसंधारण राबवले जावे. हे तुलेनेने कमी खर्चाचे व सोपे तंत्रज्ञान असलेला उपाय आहे. पावसाचे पाणी जास्तीत जास्त गावाच्या शिवारात अडवून विकेंद्रित स्वरूपाचे पाणीसाठे निर्माण करणे व भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करणे असे उपाय यामध्ये आहेत. नद्यानाल्यांच्या खोलीकरण व रुंदीकरणातून जलसंधारण साधले जावे.महाराष्ट्र राज्यात पन्नास टक्के क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी जलसंधारणाच्या माध्यमातून पाण्याचे विकेंद्रित साठे तयार करावे लागतील. जलसंधारण व मृदासंधारणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा खरा विकास होवू शकतो. विकेंद्रित जलसाठे तयार करून पाण्याचा योग्य वापर करणे आवश्‍यक आहे. पाण्याचेच विकेंद्रित गुणवत्तापूर्ण व्यवस्थापन करणे अत्यावश्यक आहे. आपल्या राज्यात जी लहान-मोठी तलावे फुटलेली व गाळाने भरलेली आहेत, त्यांची दुरूस्ती करणे व गाळ काढणे आवश्यक आहे. शिरपुर पॅटर्न हा प्रयोग त्या त्या भागातील भूगर्भाची रचना पाहून राबविला पाहिजे.

दुष्काळ निवारणासाठी पाणलोट क्षेत्र विकासात छोटी झाडे, गवत आणि झुडूपवर्गीय झाडांची लागवड इत्यादी आवश्यक असते. वनीकरण आाणि वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घ्यावा लागतो. सामाजिक वनीकरण योजना विभागाच्यावतीने वनीकरण प्रयत्न सुरु केले आहेत. राष्ट्रीय वनीकरण कार्यक्रम यासाठी अर्थ सहाय्य देते. महाराष्ट्र शासन पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी जलयुक्त शिवार योजना राबवित आहे. त्या अंतर्गत शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्था किंवा व्यक्तींना रोपे पुरवठ्याची कामे सुद्धा वन विभाग व सामाजिक वनीकरण विभाग करत आहे. या अनुसार इ.स.२०१६ पासून दोन कोटी वृक्ष लागवड केली जात आहे. यासाठी विविध शासकीय विभागांना वृक्षारोपणाचे उद्दिष्ट दिलेले आहे. सर्वत्र फोटो व शाबासकी मिळविण्याच्या उद्देश्याने वृक्षारोपण तर केले जाते. मात्र वृक्षसंवर्धनाची हमी घेताना कोणीच आढळत नाहीत. ‘वनांचा जिल्हा गडचिरोली’ म्हणून जगजाहीर आहे, मात्र येथेच पावसाने दडी मारल्याने ‘जंगलांमुळे पाऊस भरपूर पडतो’ हे विधानच यंदा धादांत खोटे ठरले आहे. दिवसेंदिवस पाऊस कमी होत आहे, ज्यामुळे नेहमी दुष्काळजन्य परीस्थिती निर्माण होते.

ओला दुष्काळ म्हणजे एखाद्या विशिष्ट क्षेत्रात काही काळ सतत किंवा नेहमीच्या पर्जन्यमानापेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे- अतिवृष्टीमुळे पीकांची झालेली हानी, पूरामुळे जीव व वित्तहानी, पाण्याचा सुकाळ अशी परिस्थिती उद्भवणे होय. ही परिस्थिती कोरड्या दुष्काळाच्या बिलकुल विरुद्ध असते. एखाद्या विशिष्ट क्षेत्रात काही काळ सतत पाऊस पडल्यास त्यामुळे होणारं शेतीचं नुकसान म्हणजेच ओला दुष्काळ होय. एखाद्या भागात दिवसभरात ६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्यास आणि या पावसामुळे ३३ टक्क्यांहून अधिक पिकांचं नुकसान झाल्यास त्या भागाचा समावेश ओला दुष्काळग्रस्त भागात केला जातो. याअंतर्गत कोरडवाहू शेतीसाठी जवळपास १३ हजार रुपये प्रति हेक्टर आणि बागायती शेतीसाठी जवळपास १८ हजार रुपये प्रती हेक्टर नुकसान भरपाई दिली जाते. नागपूर विदर्भ विशेषतः गडचिरोली जिल्हा वगळता राज्यात सर्वत्र अतिवृष्टीच्या रूपात पाऊस अक्षरशः थैमान घालत आहे. महापुराने लावलेली पीके खोदून- खरडून नेली. फळांनी डवरलेली फळझाडे जमीनदोस्त झाली. अनेक दिवस पाण्यात बुडून असलेली पीके कुजून सडून मातीमोल झालीत. शेतकरी बिचारा डबडबलेल्या डोळ्यांनी नुसता टकमक बघतच राहिला. यात घरदारासह जीवित हानीही खुप झाली.

राज्यातील शेतीचे अतोनात नुकसान झाल्यामुळे राज्यात दुष्काळ जाहीर करावा, अशा मागणीचा टाहो शेतकरी बांधव फोडत आहे, मात्र शासन कानात बोळे घालून साखरझोपेत असल्याच्या आविर्भावात बिनधास्त आहे. शासनाची विविध अंगे येथीलच असून उघड्या डोळ्यांनी अतिवृष्टी व अवर्षण अनुभवत आहेत. तरीही पिक नमूने, पाहणी, सर्वेक्षण अशा नुसत्याच टाईमपासच्या प्रक्रिया सुरू आहेत. हे सर्व उपद्व्याप जखमेवर मीठ चोळण्यासारखे नाहीत का? परतीच्या पावसाने मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेली पीके नष्ट झाली आहेत. त्यामुळे केवळ घोषणा न करता शेतकऱ्यास शासनाकडून सरसकट छक्केपंजे न लावता मदत मिळणे क्रमप्राप्त आहे.

!! अन्नदाता सुखी भवः !!

✒️शेतकरीपुत्र:-श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे(शेती व शेतकरी संबंधी समस्या मांडणारे साहित्यिक)मु.पो.ता.जि. गडचिरोली.(व्हा. नं. ९४२३७१४८८३.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here