Home महाराष्ट्र कोलामांच्या विकासासाठी योग्य ते प्रयत्न करणार-प्रकल्प अधिकारी रोहण घुगे

कोलामांच्या विकासासाठी योग्य ते प्रयत्न करणार-प्रकल्प अधिकारी रोहण घुगे

53

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.4ऑक्टोबर):-विकासाच्या मार्गावर मागे पडलेल्या कोलाम जमातीच्या विकासासाठी जिल्हा प्रशासन कटीबध्द असून, त्यांच्या विकासाच्या सर्वच योजनांची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचा आटोकाट प्रयत्न केला जाणार आहे. व याकामी कोलाम विकास फाऊंडेशनच्या व कोलाम युवक युवतींच्या सहयोगाची नितांत गरज आहे असे मत चंद्रपूरचे जिल्हा प्रकल्प अधिकारी रोहण घुगे यांनी दिली.चंद्रपूर जिल्ह्यातील आदिम कोलाम जमातीच्या युवक व युवतींसाठी कोलाम विकास फाऊंडेशन व श्री शिवाजी महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागाच्या वतीने दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

या कार्यशाळेला प्रसिध्द नाट्यदिग्दर्शक हरिष इथापे मार्गदर्शन करित आहेत. या कार्यशाळेला जिवती, कोरपना व राजुरा तालुक्यातील ५० शिबीरार्थी सहभागी झाले आहेत. या कार्यशाळेचे उद्घाटन प्रकल्प अधिकारी रोहण घुगे यांचे हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डाँ. राजेश खेराणी उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रणय राठोड, संस्थेचे अध्यक्ष विकास कुंभारे, प्रा. विठ्ठल आत्राम, हरिष इथापे हे उपस्थित होते.

कोलाम युवक युवतीच्या मनातली भिती दूर होऊन त्यांच्यातील आत्मविश्वास वाढीस लागावा व त्यांची शिक्षणातील रूची वाढीस लागावी या हेतुने कोलाम विकास फाऊंडेशन सातत्याने प्रयत्न करित आहे व त्याचात एक भाग म्हणून श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सहयोगाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आल्याची माहीती संस्थेचे अध्यक्ष विकास कुंभारे यांनी दिली. या कार्यशाळेत युवकांचा प्रचंड उत्साह दिसत असून, अनेक शिबिरीर्थ्यांनी अशी कार्यशाळा प्रथमच अनुभवत असल्याचे मत व्यक्त केले.उद्घाटन सत्राचे संचालन प्रा. राजेंद्र मुद्दमवार यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. विठ्ठल आत्राम यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here