



🔹अडगळीतील गोंड, कोलामांना भेटून रस्ता, पाण्याची सुविधा करण्याचे दिले आश्वासन
✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)
जिवती(दि.4ऑक्टोबर):-जलम गेल्ला सायेब, या डोंगराची वाट चढतानी.. आमी चडलो.. आमच्या पोरांनीबी डोंगराचीच वाट चडली. आमच्या नातवांनीबी काट्या कुट्याची वाट चडावी… असं किती दिसं चालाचं सायेब. हा तुमचा न्याय हो का.. आमाले रस्ता देता का नाई ते बोला.. असे खडे बोल सुनविले घोडणकप्पी या वस्तीवरच्या एका उद्विग्न झालेल्या आदिम म्हातारीने.. जीवती तालुक्यातील अगदी शेवटच्या टोकावर असलेल्या घोडणकप्पी या आदिवासी वस्तीची दुरावस्था बघून प्रत्यक्ष चंद्रपूर जिल्ह्याचे प्रकल्प अधिकारीही अचंबित झाले आणि त्यांनी या वस्तीवरील पाण्याची व रस्त्याची समस्या तातडीने दूर करण्याचे आश्वासन दिले.
कोलाम विकास फाऊंडेशन या संस्थेने गेल्या स्वातंत्र्यदिनी घोडणकप्पी या आदिम वस्तीवर तिरंगा फडकविला व शेकडो कोलाम बांधव व भगिणी आणि अनेक संस्थांच्या सहयोगाने डोंगर पोखरून घोडणकप्पीचा रस्ता बनविण्याचे अनोखे आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेऊन चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी कोलाम विकास फाऊंडेशनच्या पदाधिका-यांसोबत बैठक घेतली व सर्व कोलामगुड्यांवरील मुलभूत सोयी-सुविधांचा आढावा घेऊन त्या तातडीने सोडविल्या जातील असे आश्वासन दिले. समस्या जाणून घेण्याच्या हेतुने प्रकल्प अधिकारी रोहण घुगे हे घोडणकप्पी या कोलाम गुड्यावर पोहोचले. घोडणकप्पीतील पडझड झालेले घरे पाहून अधिकारी अचंबित झाले. वस्ती सोडून डोंगराच्या पलीकडे जंगलात निवा-याला गेलेल्या कोलाम कुटूंबाबाबतही त्यांनी चौकशी केली. कोलामांकडे पाण्याबाबत चौकशी केली. पाण्याचे स्त्रौत तपासून पाहीले.
व अधिका-यांचा ताफा घोडणकप्पी गोंडगुड्याकडे वळला. डोंगराची निसरडी वाट उतरताना अधिका-यांचा पायही घसरत होता. ही अवघड वाट चढून शाळेला जातांना चिमुकल्यांना किती धापा लागत असतील, त्यांना काय यातना भोगाव्या लागत असतील याचा प्रत्यक्ष अनुभव प्रकल्प अधिका-यांनी घेतला. त्यांचे सोबत सहाय्यक प्रकल्प अधिकारी विनय राठोड, कोलाम विकास फाऊंडेशनचे अध्यक्ष विकास कुंभारे व अन्य निरीक्षक, कर्मचारी होते.
वस्तीत अधिकारी पोहोचले. हळू-हळू आदिम बांधव जमु लागले. पाणि कुठून आणता.. महीलांनी फुटक्या विहीरीकडे बोट दाखविले. तक्रारीच्या फै-या झळू लागल्या. प्रत्येकजन आपले दुखने मांडू लागले. अधिकारी ऐकत होते.. घरांची दुरावस्था, पाण्याची गैरसोय, डोंगरावरची अवघड वाट सगळेच प्रश्न निरूत्तर करणारे होते. पण, कोलाम विकास फाऊंडेशनच्या आंदोलनाने प्रश्नांना वाचा फुटली, आज अधिकारी वस्तीवर पोहोचले. आता रस्ता, पाणीही नक्कीच येईल ही आशा आदिम बांधवांमध्ये जागी झाली.


