Home महाराष्ट्र साश्रूनयनांनी वानरीला अखेरचा निरोप…आमच्या प्रयत्नांना यश आले नाही याचे दुःख – भागवत...

साश्रूनयनांनी वानरीला अखेरचा निरोप…आमच्या प्रयत्नांना यश आले नाही याचे दुःख – भागवत महाजन

76

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील)

धरणगाव(दि.3ऑक्टोबर):-आज वि. का.सोसायटी जवळ झालेल्या ट्रक च्या अपघाताने गंभीररीत्या जखमी झालेल्या वानरीचे दुपारी १२:१५ वाजता दुःखद निधन झाले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज सकाळी ९ वाजता विविध कार्यकारी सोसायटीजवळ एका ट्रक च्या धक्क्याने वानरी गंभीररीत्या जखमी झाली. ही सर्व घटना लहान माळी वाडा परिसरातील भागवत महाजन (आटो वाले) यांनी बघितली व त्यांनी त्या वानरीला आपल्या रिक्षातून ग्रामीण रुग्णालयात आणले. ग्रामीण रुग्णालयात तिच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. त्यानंतर या घटनेची माहिती लहान माळी वाडा (मढी परिसर) येथील युवक मंडळाच्या सर्व मित्रांना कळली असता त्यांनी लगेचच ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली.

त्यानंतर वानरी ला लहान माळी वाड्यात भागवत महाजन यांच्या घरी आणले गेले. या सर्व प्रकारची माहिती वनविभाला देण्यात आली, त्यांनी प्रत्यक्ष येऊन सर्व परिस्थिती पाहिली. भागवत महाजन यांच्यासह सर्व युवक मित्रांनी कसोशीने प्रयत्न केले परंतु दुर्दैवाने त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. त्या जखमी वानरी चे आज दुपारी १२:१५ वाजता दुःखद निधन झाले. वानरीच्या निधनाबाबतची सर्व माहिती वनविभागाला देण्यात आली आहे. भागवत महाजन यांच्या घरी परिसरातील महिला मंडळींनी येऊन आपल्या दुःखद संवेदना व्यक्त केल्या. ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्ती चे निधन झाल्यानंतर सर्वदूर हळहळ व्यक्त केली जाते त्याप्रमाणे या वानरीच्या निधनाने सर्व परिसरावर शोककळा पसरलीे. मृत वानरीचे विधिवत सर्व विधीसंस्कार करण्याचे निश्चित करण्यात आले.

या मातेचे एक लहानसे पिल्लू देखील या अपघातात जखमी झाले परंतु सुदैवाने त्याचा जीव वाचला. आईपासून दुरावलेल्या त्या लेकराला पाहून सर्वांचे डोळे पाणावले. परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात वनविभागाची पूर्व परवानगी घेऊन या मृत वानरीवर ‘वानर देव मंदिर’ सोनवद रोड येथे विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले. दूध चढवण्याचा कार्यक्रम उद्या दि. ४/१०/२०२१ रोजी सकाळी ७ वाजता होईल. तसेच येत्या काही दिवसात नवरात्रोत्सव सुरू होणार असल्यामुळे वानरीचा दशक्रिया विधीचा कार्यक्रम तिसऱ्या दिवशी म्हणजे दि. ५/१०/२०२१ रोजी सिध्दी हनुमान मंदिर येथे होणार आहे. मृत वानरीच्या लहान पिल्लाला उद्या वनविभागाच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. या अंत्यसंस्कार प्रसंगी गावातील व परिसरातील अनेक नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. या सर्व घटनाक्रमात भागवत महाजन यांच्यासह लहान माळी वाडा (मढी परिसरातील) सर्व युवक मित्र परिवाराने परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here