Home महाराष्ट्र महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर

महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर

148

डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी हे परस्परांचे कट्टर शत्रू असून पुणे करार त्याचा पुरावा आहे, गांधींनी बाबासाहेबांसाठी काहीच केलं नाही उलट कायम त्यांच्या विरोधात होते असा दुष्प्रचार केला जातो. महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परस्परांतील संबंध, वैचारिक प्रासंगिक विरोध, जिव्हाळा, भूमिका याबद्दल जाणून घेतांना फक्त एकाच गोष्टीवरून किंवा घटनेवरून निष्कर्षापर्यंत पोचणे कदापि योग्य होणार नाही. त्याकरिता आपल्याला या दोघांच्या परस्पर संबंध असणाऱ्या सर्वच घटना समजून घेणे आवश्यक आहे. मतभेद कुणात नसतात? एकाच आईवडिलांनी जन्म दिलेल्या, संस्कार दिलेल्या , शिक्षण दिलेल्या दोन सख्ख्या भावांमध्ये काही गोष्टींवरून मतभेद असतात. कोणत्याही व्यक्तीचे १००% सर्वच विचार कोणत्याही व्यक्तीला पटणार नाहीतच. सरदार वल्लभभाई पटेल, पंडित नेहरू अशा गांधींच्या अगदी जवळच्या लोकांशी पण गांधींचे काही बाबतीत मतभेद होतेच.

परंतु याचा अर्थ ते परस्परांचे शत्रू होते असा होत नाही. शब्दप्रामाण्य, ग्रंथप्रामाण्य, व्यक्तिपूजा याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ठाम विरोध होता. बाबासाहेब प्रासंगिक विरोधातून काही गोष्टी बोलले असतीलही पण त्याच विचारांवर ते कायम ठाम नव्हते हे ही तितकेच खरे आहे. बाबासाहेब तेव्हा तसे का बोलले? त्याचा संदर्भ काय हे कुणीच पडताळून पाहण्याच्या फंदात पडत नाही. बाबासाहेब आणि गांधीजी या दोघांनीही अनेकदा म्हंटले आहे की माझ्या विचारात, बोलण्यात तुम्हाला तफावत दिसत असेल आणि कोणता खरा मानावा अशी दुविधा असेल तर कायम माझा शेवटचा विचार, बोलणं हे प्रमाण मानलं जावं. हे आपण विसरून जातो.

गांधी आणि बाबासाहेब यांच्याबाबतीत चर्चा करतांना दोघांचेही प्राधान्यक्रम वेगळे होते. गांधींचे प्राधान्य संपूर्ण देशाचे स्वातंत्र्य हे तर होतेच त्याचसोबत अस्पृश्यता निवारण, देशाची अखंडता व हिंदू-मुस्लिम ऐक्य जपणे , साम्राज्यवादाला विरोध, स्वदेशी, सामान्य जनतेला स्वातंत्र्यलढ्यात सामावून घेणे हे सुद्धा होते. बाबासाहेबांचे प्राधान्य याच देशात ज्यांचं अस्तित्वच नाकारल्या जात होत, जे गुरा-ढोरांसारखे जीवन जगत होते त्या अस्पृश्य समाजाची त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायातून मुक्ती हे होतं. हा फरक सुद्धा आपण लक्षात घेतला पाहिजे.दलितांच्या विभक्त मतदार संघाला पूर्ण ताकदिनिशी महात्मा गांधींनी विरोध केल्यामुळे बाबासाहेबांना माघार घेऊन पुणे करार करावा लागला त्यामुळे दलितांवर सर्वात मोठा अन्याय झाला असा दुष्प्रचार अनेक गांधीविरोधक करत असतात. हिंदूंपासून मुस्लिमांना वेगळं पाडण्यासाठी ब्रिटिशांनी मुस्लिमांसाठी विभक्त मतदार संघाची घोषणा केली.

या मुस्लिमांसाठी केल्या गेलेल्या विभक्त मतदारसंघामुळेच देशात फाळणीची बीजे रोवली गेली आणि लोकमान्य टिळकांच्या पुढाकाराने झालेल्या लखनौ करारामुळे या बीजांना खत-पाणी मिळाले.१९०९ मध्ये मुस्लिमांना हिंदूंपासून तोडण्यासाठी मुस्लिमांना विभक्त मतदारसंघ देण्यात आले. त्याचप्रमाणे १९३२ साली दलितांनाही विभक्त मतदारसंघ देण्याची घोषणा करण्यात आली. त्याविरोधात महात्मा गांधींनी उपोषण सुरु केलं कारण त्यांना ब्रिटिशांचा भारतीय जनतेत फूट पडण्याचा कट हाणून पाडायचा होता. आता बऱ्याच मंडळींना विभक्त मतदारसंघ आणि राखीव मतदारसंघ समजून घेण्यात गफलत होते. हा फरक समजून घेऊन विभक्त मतदार संघाऐवजी गांधी बाबासाहेबांना त्याच्या दुप्पट संख्येत राखीव मतदारसंघ द्यायला तयार होते हे इथे लक्षात घेतलं पाहिजे. गांधींनी विभक्त मतदार संघाला विरोध केला म्हणजे त्यांनी दलितांच्या राखीव मतदारसंघालाच विरोध केला असा गैरसमज केल्या जातो.

या स्वतंत्र मतदार संघविरोधातील उपोषणाच्या पाचव्या दिवशी म्हणजेच दि. २४ सप्टेंबर ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर गांधींना भेटले. “आम्हाला वेगळा मतदारसंघ मिळत असतांना आपण विरोध करत आहात, तुम्हीं आम्हाला काय देणार आहात ते सांगा,” असं बाबासाहेबांनी गांधींना स्पष्टपणे विचारलं. बाबासाहेब स्पष्ट बोलल्यामुळे गांधी त्यांना म्हणाले, “तुम्ही जन्माने दलित आहेत, मी स्वेच्छेने दलित झालो आहे. अस्पृश्यतेविरोधात तुमच्या खांद्याला खांदा लावून लढायला मी तयार आहे. अस्पृश्यांनी कायम अस्पृश्य राहावं हे मला पसंत नाही, म्हणून विभक्त मतदारसंघाला माझा विरोध आहे. प्रांतिक निवडणुकांत मात्र तुम्हाला कमी जागा मिळाव्यात, हे स्वीकारायला मी तयार नाही. ” चर्चेअंती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गांधींच्या योजनेप्रमाणे संयुक्त राखीव मतदारसंघांना मान्यता दिली. पण त्यांची संख्या ब्रिटिश पंतप्रधान मॅक्डोनाल्ड यांनी सुचविलेल्या ९७ जागांवरून १४७ जागांवर नेण्यात यावी अशी मागणी केली. गांधींनी ती मान्य केली. हाच तो सुप्रसिद्ध पुणे करार जो गांधीविरोधकांनी गांधींच्या नावे कुप्रसिद्ध करून ठेवला. पुणे करार हा गांधी आणि डॉ. आंबेडकरांमधील शत्रुत्वाचं द्योतक आहे असे म्हणणाऱ्यांनी विभक्त व राखीव मतदारसंघातील फरक व हा पुणे करार पूर्णपणे समजून घेतला पाहिजे.

दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजता इंग्रज सरकारने पुणे कराराला मान्यता दिल्याची घोषणा लंडन व दिल्ली येथे केली व गांधींनी उपोषण सोडले. त्याच दिवशी म्हणजे २५ सप्टेंबर ला मुंबईत कोर्टातील इंडियन मर्चन्टस असोसिएशनच्या हॉल मधील सभेत बोलतांना डॉ.बाबासाहेब आंबडकर म्हणाले, “माझ्यातले आणि गांधींमधले साम्य मला आश्चर्यचकित करून गेले. आरंभी आमच्यात मतभेद होते; परंतु जेव्हा जेव्हा मतभेदाचे महत्वाचे मुद्दे त्यांच्यासमोर मांडले गेले, तेव्हा तेव्हा गांधी माझ्याच बाजूने बोलतांना व उभे राहतांना मला आढळले. या लढ्याच्या वाटाघाटीतून पार पडण्यास मुख्यतः महात्मा गांधीच कारणीभूत झालेले आहेत. मला एका मोठ्या व्युहातून बाहेर काढण्यास मदत करणाऱ्या महात्माजींचा मी कृतज्ञ आहे. मला मोठे आश्चर्य वाटते की, माझ्या सर्व मागण्यांना म.गांधींनी मान्यता देऊन उलट माझेच अभिनंदन केले. ही भूमिका त्यांनी दुसऱ्याच राउंडटेबल परिषदेच्या प्रसंगी घेतली असती तर असे बिकट वातावरण कधीच उत्पन्न झाले नसते.” या बाबासाहेबांच्या उद्गारावरून आपणास काय वाटते? याच ऐतिहासिक पुणे करारानंतर बऱ्याच वर्षांनी लुई फिशर या गांधींच्या चरित्रकाराने ,”तुम्ही पुणे करार मान्य का केलात?” असे डॉ. आंबेडकरांना विचारले असता बाबासाहेब म्हणाले , ” गांधींशी माझे तीव्र मतभेद आहेत.

मात्र या संबंध जगात मला समजून घेणाराही फक्त गांधी हा एकच माणूस आहे.” हा संवाद वाचला की गांधी व बाबासाहेब यांच्यातील सामंजस्य व हे एकाच ध्येयासाठी दोन वेगवेळ्या मार्गाने चालणारे महापुरुष होते हे लक्षात येते.
२८ सप्टेंबर १९३२ पुणे करारानंतर वरळी मुंबई येथे झालेल्या पहिल्या जाहीर सभेत बाबासाहेब म्हणतात, “अस्पृश्यांच्या सुदैवाने या वेळी मात्र अस्पृश्यांच्या मागण्यास महात्माजींचा विरोध नव्हता. त्यांचा मला पुष्कळ वेळी उपयोग झाला. महात्माजींनी पुष्कळच मिळते घेतले व हिंदू पुढाऱ्यांशी आता आपला जो तहनामा झाला त्यात अस्पृश्यांचा फायदाही झाला. बंधू आणि भगिनींनो पण मिळालेल्या फायद्याचा तुम्ही जर योग्य तऱ्हेने उपयोग करून घेतला नाही तर आंधळयापुढे रत्न ठेवण्यासारखी तुमची स्थिती होईल.”यावेळी एक महत्वाची गोष्ट आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे की नंतर बाबासाहेबांनासुद्धा गांधींचे म्हणणे पटले होते कारण ज्या स्वतंत्र मतदारसंघासाठी बाबासाहेब आग्रही होते त्या दलितांसाठीच्या स्वतंत्र मतदार संघांची मागणी बाबासाहेबांनी जेव्हा राज्यघटना लिहिली गेली तेव्हा केली नाही.

बाबासाहेब तर मसुदासमितीचे अध्यक्ष होते. बाबासाहेबांकरिता स्वतंत्र्य मतदारसंघ जर जीवन-मरणाचा प्रश्न असता तर बाबासाहेबांनी राज्यघटना लिहितांना पुणे करारात केलेल्या मागण्या का घटनेत नमूद केल्या नाहीत? का घटना लिहितांना स्वतंत्र मतदारसंघ मागितले नाहीत? बरं मागणी केली असती, विधेयक मांडले असते ते मंजूर झाले नसते हे समजून घेतलं असत. पण त्यानिमित्ताने त्यावर किमान चर्चा घडून आली असती परंतु त्या विषयावर साध्या चर्चेचीसुद्धा नोंद नाही.

वरील पुणे कराराबद्दल माहिती वाचतांना आपल्या मनात एक प्रश्न निश्चितच येईल की गांधींनी मुस्लिमांच्या विभक्त मतदारसंघाला विरोध केला नाही पण दलितांच्या विभक्त मतदार संघाला विरोध केला तर याठिकाणी मी सांगू इच्छितो कि १९०९ साली म्हणजे गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परत येण्याआधीच ब्रिटिशांनी मुस्लिमांसाठी वेगळ्या मतदारसंघाची मान्यता देऊन टाकली होती. गांधी भारतात आले १९१५ साली. टिळकांनी लखनौ करार केला १९१६ साली. जेव्हा गांधी न देशाचे नेते होई न काँग्रेसमध्ये होते.

जवाहरलाल नेहरू राज्यघटना लिहिण्याकरिता विदेशातून मानधन देऊन विचारवंत बोलविण्याच्या तयारीत असतांना महात्मा गांधींनीच नेहरूंना बाहेर देशातून कुणीच नको, डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे काम करण्यास समर्थ असल्याचे सांगितले. त्यानुसार नेहरूंनी बाबासाहेबांना बोलावून मंत्रिमंडळात स्थान घेण्यासाठी विचारणा केली. बाबासाहेबांनी आपल्या आत्मकथेमध्ये लिहून ठेवलंय की, ‘जवाहरलाल नेहरूंनी मला सचिवालयात बोलावून, स्वतंत्र भारताच्या मंत्रिमंडळात विधी मंत्रिपद स्वीकारण्यास तयार व्हाल काय? अशी पृच्छा केली. याला मी होकार दिला कारण मला मंत्रिमंडळात घेण्यासाठी त्यांनी कोणतीही अट ठेवलेली नव्हती.’

१९४६ मध्ये बाबासाहेब ज्या जेंसोर-खुलना मतदार संघातून निवडून आले होते तो बंगालमधील मतदारसंघ पूर्व पाकिस्तानात (आताचा बांगलादेश)गेला होता. गांधींना बाबासाहेब घटना समितीवर पाहिजे होते कारण बाबासाहेबांची विद्वत्ता आणि बुद्धिमत्ता दोन्हींवर त्यांचा विश्वास होता. परंतु त्यासाठी बाबासाहेब कुठल्यातरी मतदारसंघातून निवडून येणे आवश्यक होते. त्याकरिता गांधींनी नेहरूंना सूचना केल्या व बाबासाहेबांना बॉम्बे मतदारसंघातून उभे करून निवडून आणलं. बाबासाहेबांनी केलेला विरोध-मतभेद गांधींनी कधीच देशहिताच्या किंवा वैयक्तिक संबंधाच्या आड येऊ दिला नाही. हेच त्यांचं महात्म्य. गांधी आणि बाबासाहेबांमध्ये जर शत्रुत्व असत तर गांधींकडे आणि काँग्रेसकडे बहुमत असतांना त्यांनी बाबासाहेबांना निवडून आणून मंत्रिमंडळात सामावून घेतलं नसत आणि गांधींवर बाबासाहेबांना मंत्रिमंडळात घेण्यासाठी कुणाचाच दबाव नव्हता. त्यांनी घटना लिहिण्यासाठी नेहरूंची शिफारस ग्राह्य धरून विदेशातून कुणी व्यक्ती बोलावला असता तरी कुणाचीच काही हरकत असण्याचे कारण नव्हते. परंतु गांधींनी बाबासाहेबांचे नाव पुढे करून त्यासाठी आग्रह धरला. त्यावेळची काँग्रेस ही गांधींच्याच अधिपत्याखाली होती आणि काँग्रेसचेच बहुमत होते. गांधी आणि काँग्रेसने घटना लिहितांना देखील बाबासाहेबांनी समाविष्ट केलेल्या विषयांना बहुमतामुळे मान्यता दिली नसती तर ते विषय मान्य झाले नसते. हा विचार सुद्धा यानिमित्ताने करणे गरजेचे आहे.

महाडला बाबासाहेबांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला त्या सत्याग्रहाच्या मंडपात फक्त एकच फोटो लावलेला होता आणि तो म्हणजे महात्मा गांधींचा होता. असे बाबासाहेब संपादक असलेल्या ‘बहिष्कृत भारत’ यात नमूद केलेले आहे. (डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बहिष्कृत भारत आणि मूकनायक, महाराष्ट्र शासन, मुंबइं २००८, पृ. १६२) ही घटना काय दर्शवते?
एक आणखी प्रसंग इथे सांगावा लागेल, गांधींच्या मृत्यूनंतरची घटना आहे. गांधींचे सचिव प्यारेलाल नवी दिल्ली इथल्या कॅनॉट प्लेसवरील खादी भांडाराकडे चालले होते. अचानक एक गाडी त्यांच्याजवळ येऊन थांबली. दरवाजा उघडून एक सुटाबुटातला माणूस उतरला. नमस्कार करून प्यारेलालजींना त्यांनी एक निमंत्रणपत्रिका दिली. पत्रिका देणारे होते डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्या दुसऱ्या विवाहाची ती पत्रिका होती. प्यारेलाल यांच्या हातात निमंत्रणपत्रिका देतांना डॉ. आंबेडकर म्हणाले, ” आज बापू असते तर किती खुश झाले असते!” यावरून के आकलन होते?

बाबासाहेब आणि महात्मा गांधी यांच्यात शत्रुत्व दाखवणारे गांधीविरोधक बाबासाहेबांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गांधींना हीन दाखवतातच पण बाबासाहेबांबद्दल यांचे काय विचार होते हे समजून घेतल्याशिवाय त्यांचा दुटप्पीपणा लक्षात येणार नाही.बुद्धीवादी म्हणविल्या जाणाऱ्या सावरकरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्मात धर्मांतर करताच त्यांना ‘बाटगे’ म्हणण्यास व ‘धर्मांतर हाच राष्ट्रद्रोह’ असे म्हणून बाबासाहेबांना देशद्रोही ठरविण्यासही मागेपुढे पाहिले नाही.. हे लोक गांधीजी व बाबासाहेब या दोघांनाही आतून हीनच लेखणारे आहेत हे लक्षात घ्यावं.”एकदा डॉ. आंबेडकर गांधींना म्हणाले होते, “मला आणि माझ्या विचारांना तुम्ही जितकं समजून घेता तितके तुमचे अनुयायी समजून घेत नाहीत.” ते दोघेही महापुरुष होते. अशा क्षुल्लक गोष्टींतून जर परस्परांचा द्वेष करत बसले असते तर दोन्ही उत्तुंग व्यक्तिमत्वे महात्मा-महापुरुष झाले असते का?मनुवादी नथूराम गोडसेचा सर्वात मोठा शत्रू (गांधी) हा समतावादी आंबेडकरांचा सुद्धा मोठा शत्रू कसाकाय होऊ शकतो हे कोड उलगडण्यासाठी चिकित्सा करून सत्य जाणून घेण्याची गरज आहे. त्या दोघांचे काही बाबतीत वैचारिक मतभेद असतीलही परंतु मनभेद नव्हते व आज ज्याप्रमाणे काही उत्साही लेखक लिहितात तसे ते परस्परांचे शत्रू निश्चितच नव्हते.

मतभेद गांधीजी आणि बाबासाहेब यांच्यामध्ये अधिक होते की बाबासाहेब आणि मनुवाद्यांमध्ये अधिक होते? बाबासाहेबांना महाडचा सत्याग्रह, मंदिर प्रवेश चळवळ आणि शेवटी धर्मांतर करावे लागले ते काय गांधींमुळे? हा विचारसुद्धा यानिमित्ताने व्हायला हवा. *(‘मजबुतीका नाम महात्मा गांधी’ या आगामी पुस्तकातून)*

ह्या स्वातंत्र्यलढ्याच्या सरसेनापतीला जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन…💐❤️💐

✒️लेखक:-चंद्रकांत झटाले(अकोला)मो:-9822992666

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here